बाजार समितीच्या आंबा खरेदी-विक्रीला अल्प प्रतिसाद

रत्नागिरी :- कोरोनामुळे संकटात सापडलेल्या हापूसला हात देण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घेतला. बाजार समितीच्या आवारात आंबा खरेदी – विक्री सुरू करण्यात आली. परंतु या प्रक्रियेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. आठ दिवसात अवघ्या अडीच लाख रुपयांचा हापूस या ठिकाणी विकला गेला आहे. डझनला पावणेतीनशे ते साडेचारशे रुपये दर मिळाला आहे.

गेली दोन वर्षे बाजार समिती आवारात उभारलेल्या लाखो रुपयांच्या आंबा खरेदी-विक्री केंद्राला कोरोनातील लॉकडाऊनमुळे मुहूर्त मिळाला. त्यासाठी जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक गार्डी यांनी पुढाकार घेतला होता. आंबा ने-आण करण्यासाठी बागायतदारांची होत असलेली पंचाईत लक्षात घेऊन ही व्यवस्था सुरु केली गेली. 23 एप्रिलला याचा आरंभ झाला. 

गेल्या आठ दिवसात बाजार समितीत किरकोळ आंब्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरु झाले. त्यामध्ये 
2 मे रोजी सुमारे 120 डझन आंब्याची विक्री झाली असून सुमारे साठ हजार रुपयांची उलाढाल झाली. 29 एप्रिलला 253 डझनची विक्री झाली, त्यातून 81 हजार 900 रुपये मिळाले. त्यादिवशी पेटी 2100 रुपये दर मिळाला. 28 ला 247 डझन आंब्यांच्या विक्रीतून 1 लाख 8 हजार रुपये मिळाले. या दिवशी साडेचारशे रुपये डझन इतका दर आंब्याला मिळाला होता. 27 एप्रिलला 10 हजार 950 रुपयांची विक्री झाली असून 30 डझन आंबे उपलब्ध होते. यामध्ये आंब्याचा दर डझनला पावणेतीनशेपासून साडेचारशे रुपयांपर्यंत होता. मे महिना हंगाम असल्यामुळे नियमित विक्री सुरु राहणार असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.