प्रांतांच्या वाहनाला मागून धडक; गुन्हा दाखल

रत्नागिरी :- उपविभागीय अधिकार्‍याच्या सरकारी वाहनाला पाठीमागून धडक देत अपघात केल्याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धटना शनिवार 2 मे रोजी सकाळी 10.45 वा.सुमारास कुवारबाव येथील नाकाबंदीच्या ठिकाणी घडली.

याबाबत सरकारी वाहन चालक राहुल भिकाजी जाधव (58,नरहर वसाहत,रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार,शनिवारी सकाळी राहुल जाधव हे आपल्या ताब्यातील सरकारी गाडी (एमएच-08-एएन-3311) मधून उपविभागीय अधिकारी विकास सुर्यवंशी यांना घेउन संगमेश्वर येथील कोरोना रुग्णाची माहिती घेउन रत्नागिरीत येत होते. ते कुवारबाव येथे आले असता तेथील नाकाबंदीच्या ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्याशी बोलण्यासाठी विकास सुर्यवंशी हे थांबले होते. त्यावेळी हातखंबा येथून येणार्‍या टेम्पोचालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि त्याने राहुल जाधव यांच्या ताब्यातील सरकारी वाहनाला पाठीमागून धडक देत अपघात केला. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.