प्रवासाची परवानगी नसतानाही महिला पोचली रत्नागिरीत

रत्नागिरी :- प्रवासाची कोणतीही परवानगी नसताना मुंबई-विलेपार्ले येथून देऊड येथे गावी आलेल्या महिलेविरोधात ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. या महिलेला सध्या रत्नागिरीतील एमआयडीसी परिसरात क्वारंटाइन करण्यात आले. हि महिला देवूड येथे इनोव्हा गाडीतून आल्याचे सांगत या गाडीचा शोध पोलिस घेत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार प्रवीणा चंद्रकांत देसाई (३९,रा.विलेपार्ले, मुंबई) हि महिला २७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता आली असल्याची माहिती देऊड गावच्या सरपंच शामल शांताराम घाणेकर यांना मिळाली होती.या माहितीवरून सरपंच घाणेकर यांनी त्याबाबतची खात्री करून प्रवीणा यांना शासकीय रुग्णवाहिकेतून तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले होते.मुंबई विलेपार्ले येथून आलेल्या प्रवीणा देसाई यांची तपासणी करून त्यांना एमआयडीसी येथे संस्थात्मक क्वारंटाइन केले आहे.

राज्यात संचारबंदी कलम १४४ लागू असताना जिल्हाधिकार्यांनी जिल्हा बंदी आदेश जारी केलेले असताना कोणतेही कौटुंबिक अथवा वैद्यकीय अत्यावश्यक निकड नसताना जिल्ह्यात प्रवेश केला तसेच हि महिला मुंबई सारख्या रेड झोन परिसरातून कशीकाय आली? याबाबत विचारणा केली असता कोणताही ई-पास नसताना ती महिला नातेवाईकांच्या इनोव्हा गाडीतून रत्नागिरीतील देऊड परिसरात आल्याची माहिती त्या महिलेने पोलिसांना दिली.तसे इतर समर्पक माहिती न देता प्रशासनाची तिने दिशाभूल केली आहे.