जिल्ह्यात कोरोनाचे 85 अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी:- दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने दडपणाखाली गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना रविवारी सकाळीच दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. जिल्ह्यातून मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 85 रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत.

कोरोनाचे पाच रुग्ण बरे झाल्यानंतर जिल्हावासीयांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. परंतु याच दरम्यान संगमेश्वर आणि चिपळूण येथे प्रत्येकी एक एक पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली. हे दोन्ही रुग्ण मुंबईतून प्रवास करून गावी आल्याने चाकरमान्यांना गावी आणण्याचा मुद्दा वादात सापडला आहे.  दरम्यान रविवारी सकाळीच रत्नागिरीकरांना दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. कोरोना संशयितांचे तब्बल 85 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कामथे उपजिल्हा रुग्णालय येथील 32, कळंबणी उपजिल्हा रुग्णालय 6, जिल्हा रुग्णालय रत्नागिरी 8, दापोली प्राथमिक आरोग्य केंद्र 9, गुहागर प्राथमिक आरोग्य केंद्र 10 आणि मंडणगड प्राथमिक आरोग्य केंद्र येथील 20 अहवालांचा समावेश आहे.