चिपळूण :- काल कोरोना पाॅझिटीव्ह अहवाल आलेला रुग्ण खांदाटपाली येथे वास्तव्यास आहे हे निष्पन्न झाल्यावर खांदाटपालीसह आजूबाजूचा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. या परिसरात जाण्यास किंवा येथून बाहेर पडण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. तसेच येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. येथून ३ किलोमीटर कंटेंटमेंट झोन आणि ५ किलोमीटर परिसरात बफर झोन अशी विभागणी करून पोलीस चेक नाके तयार करण्यात आले आहेत. प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.
चिपळूणात आढळून आलेला कोरोनाबाधित रुग्ण खांदाटपाली येथील असून तो एका खाजगी कंपनीत कामाला आहे. २३ एप्रिल रोजी मुंबई काळाचौकी येथून तो येथे आला होता. मुंबई जे.जे. हॉस्पिटलमध्ये त्याने वैद्यकीय चाचणी देखील करून घेतली होती. त्याच्याबरोबर अन्य दोघेजण देखील आले आहेत. मुंबई येथून अँब्युलन्सने तिघेजण येथे आले होते, अशी माहिती देखील प्रशासनाने दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून खांदाटपालीसह नवीन कोळकेवाडी, दळटवने, कलंबस्ते, वालोपे, खेड तालुक्यातील आंबडस, काडवली या गावांना कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे व ते क्षेत्र पूर्णपणे सील करण्यात आला आहे. या परिसरात जाण्यास किंवा येथून बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. येथे पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. तसेच खेर्डी, चिपळूण शहर, चिपळूण उपनगर, निरबाडे, पेढे तर खेड तालुक्यातील चिरणी, भेळसाई, केळणे, काडवली या ५ किमी परिसराचा बफर झोन अशी विभागणी करून पोलीस चेक नाके तयार करण्यात आले आहेत.
कोरोना बाधित रुग्णाच्या बरोबर मुंबईतून आलेले तसेच बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब नमुने मिरज येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.