अंतिम टप्प्यात मच्छीमारांना सुगीचे दिवस; प्रतिदिन पंचवीस टन मासळीची निर्यात

रत्नागिरी :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केलेल्या लॉकडाऊनमध्ये मच्छीमारीला शिथिलता मिळाली. गेल्या आठ दिवसात रत्नागिरीतून प्रतिदिन पंचवीस टन मासळी गोवा, केरळ, कर्नाटककडे इन्सुलेटर वाहनांमधून पाठविली जात आहे. बर्‍यापैकी मासळी मिळत असल्याने शेवटच्या टप्प्यात मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे; परंतु लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान भरुन काढणे अशक्य असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
मिरकरवाडा येथील बंदरामध्ये सुमारे चारशेहून अधिक मच्छीमारी नौका आहेत. केंद्र शासनाने मत्स्य प्रक्रिया उद्योग सुरु करण्यास परवानगी दिल्यानंतर जिल्ह्यातील मोठ्या बंदरांवरील कामकाज सुरू झाले. 18 एप्रिलपासून मासेमारीसाठी नौका समुद्रात रवाना झाल्या. सरासरी पंचवीस टक्के नौकांना खोल समुद्रात मासळी मिळत आहे. बंपर मासळी नसली तरीही एखाद्या नौकेला सर्वसाधारणपणे 25 ते 30 टप मासे मिळत आहेत. त्यात बांगडा, गेदर, काप यासह अन्य काही माशांचा समावेश आहे. गेदरला एका टपासाठी (32 किलोचा एक टप) 1800 ते 2 हजार रुपये, बांगड्यासाठी 6700 रुपये, काप 1500 ते 2 हजार रुपये तर उष्टी बांगडी 2 हजार ते 2500 रुपये दर मिळत आहे. दिवसाला साधारणपणे सुमारे 20 ते 25 टन मासळी मिळत असून ती गोवा, कर्नाटक आणि केरळला पाठविण्यात येत आहे. त्याचा वापर खाण्यासाठी केला जात आहे. परराज्यात माशांची वाहतूक करण्यासाठी इन्सुलेटर गाडीचा वापर केला जात आहे. दिवसाला सुमारे पाच ते सात मासळीच्या गाड्या रवाना होतात. यामध्ये प्रत्येक बोटीला कुटीसाठी वापरण्यात येणारी मासळीही सापडते. किमान तीन ते चार टप मासळी असते. ती मासळी कुटी सुखवणार्‍या स्थानिक लोकांना दिली जाते.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंदरातील गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मिरकरवाडा बंदरात मासळी उतरवण्यासाठी दोन जेट्यांचा वापर केला जातो. मत्स्य विभागाने एकावेळी चार नौकांना आतमध्ये आणण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार प्रत्येक दिवशी 15 मच्छीमारी नौका मासळी उतरवतात आणि समुद्रात रवाना होतात. एका नौकेला मासळी उतरणे आणि इंधन, पाणी भरणे यासाठी किमान अडीच तास लागतात. या प्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै, जयगडसह विविध बंदरांमध्ये मच्छीमारीचे कामकाज चालते.
छोट्या मच्छीमारांना मासळी मिळत नसल्याने त्यांनी आवरते घेण्यास सुरवात केली आहे. एक सिलिंडरच्या सुमारे दीड ते दोन हजार नौका आहेत. त्यातील पन्नास टक्क्याहून अधिक नौका किनार्‍यावर आणल्या गेल्या आहेत. सध्या मासळी खोल समुद्रात मिळत आहे. किनारी भागात मासेमारी करणार्‍या छोट्या नौकांना इंधनासह नियमित रोजगार मिळण्यापुरतेही मासे मिळत नसल्याचे मच्छीमारांकडून सांगितले जात आहे.