चाकरमान्यांना रत्नागिरीत आणण्याची प्रशासनाकडून तयारी


रत्नागिरी:- मुंबई, पुणे, ठाणे आदी परजिल्ह्यात नोकरी, व्यवसायानिमित्त राहणार्‍या चाकरमान्यांना रत्नागिरी जिल्ह्यात आणण्याची तयारी सुरु आहे. जिल्हा परिषद प्रशासनामार्फत ग्रामकृती दलांना तशा सुचना दिल्या आहेत. चाकरमानी आल्यानंतर त्यांच्यावर वॉच ठेवण्याची जबाबदारी ग्रामकृती दलावर राहणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण मुक्त ठेवण्यात यश आले होते; मात्र मुंबई, ठाण्यातून आलेल्यांपैकी दोघांना कोरोना झाल्याचे पुढे आले आहे. या परिस्थितीत परजिल्ह्यातून येणार्‍या चाकरमान्यांचे स्थलांतर थांबेल की काय अशी नातेवाईकांमध्ये अस्वस्थता आहे; परंतु आरोग्य तपासणी करुनच चाकरमान्यांना आणण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे तालुकास्तरावरील अधिकार्‍यांशी संवाद साधत महत्त्वाच्या सुचना दिल्या आहेत. चाकरमान्यांना कोणताही विरोध होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच गावात सलोखा राहील याकडे ग्रामकृती दलाने काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाकडून गावपातळीवर सुचना दिलेल्या आहेत.

जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामकृतीदलाची स्थापना केलेली आहे. चाकरमानी गावात दाखल झाल्यानंतर त्याची माहिती ग्रामकृतीदलाने आरोग्य विभागाला द्यावयाची आहे. त्यांना घरीच विलगीकरणासाठी ठेवण्यात येणार आहे. चाकरमान्यांवर लक्ष ठेवतानाच प्रत्येक दिवशी ते घरात आहेत कींवा नाहीत याची माहिती घेण्यात यावी अशा सुचना दिल्या आहेत. प्रतिदिन त्या लोकांना भेट देणे, त्यांना लक्षणे उद्भवली आहेत किंवा नाही याची पाहणी करणे, तसे आढळल्यास उपचारासाठी दाखल करणे या गोष्टी गावपातळीवर कराव्या लागणार आहेत. ग्रामकृतीदलाने केेलेल्या कामाची माहिती गावागावात असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रात नोंदवण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही गावस्तरावर करण्याच्या सुचना जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत.