कोकण रेल्वेच्या पार्सल ट्रेनला अल्प प्रतिसाद

रत्नागिरी :- कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या स्पेशल पार्सल गाडीच्या परतीच्या प्रवासात कोकणातून सुमारे पावणेतीनशे हापूसच्या पेट्या आणि खाद्यपदार्थ अहमदाबाद, राजकोट आणि जामनगरला रवाना झाल्या आहेत. या गाडीच्या दोन्ही फेर्‍यांना कोकणातील आंबा बागायतदारांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
कोकणातील हापूस गुजरातसह विविध भागात पोचवण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाकडून ओखा ते विरुवअनंतपुरम अशी स्पेशल पार्सल ट्रेन सोडण्यात आली. या गाडीच्या दोन फेर्‍या झाल्या. पहिल्या फेरीप्रमाणेच दुसर्‍या फेरीतून खाद्यपदाथर्र्, औषधसाठा ओखा येथून कोकणासह दक्षिणेकडील भागांकडे आला. परतीच्या प्रवासात अधिकाधिक हापूसच्या पेट्या पाठवल्या जातील अशी अपेक्षा होती; परंतु ती फोल ठरली. केरळमधून मासळी, बनाना चिप्स रत्नागिरीत आणल्या गेल्या. कणकवलीतून 25 पेटी, राजापूरमधून 25 पेटी तर रत्नागिरीतून 225 पेटी हापूस जामनगर, अहमदाबाद, राजकोटला पाठविण्यात आला. या गाडीला सामानाचे पाच डबे जोडण्यात आले होते. दुसरी फेरी सुटली त्याचवेळी कोरोनामुळे अहमदाबाद मार्केटमधील कामकाज थंड पडले होते. परिणामी काही व्यापार्‍यांनी कोकणातील शेतकर्‍यांना आंबा पाठवू नका अशा सुचना दिल्या होत्या. त्याचा फटका रेल्वे पार्सल गाडीला बसला आहे. काही पेटींच्या ऑर्डरही रद्द केल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आली.
आंबा रेल्वेने पाठविताना करावा लागणारा खटाटोप शेतकर्‍यांना नको होता. त्यामुळे रेल्वेला प्रतिसाद मिळाल नसल्याचे काही बागायतदारांनी सांगितले. शेतकर्‍यांच्या बागेतून आंबा रेल्वेस्थानकावर पाठवणे, तिथून तो अहमदाबाद रेल्वेस्थानकावरुन बाजार समितीत नेणे यासाठीची जबाबदारी बागायतदारांवर पडत होती. त्यासाठी येणारा खर्च कमी असला तरीही सध्याच्या गडबडीत हे करणे शेतकर्‍यांना शक्य नव्हते. त्यामुळे कमी प्रतिसाद मिळाल्याची पुढे येत आहे.