कोटा येथे अडकलेले जिल्ह्यातील 19 विद्यार्थी एसटीतून रत्नागिरीत दाखल

रत्नागिरी :- राजस्थान येथील कोटा येथे अडकलेले 22 विद्यार्थी तब्बल 40 तासांचा प्रवास करुन एसटीतून आज कोकणात दाखल झाले. यामध्ये रत्नागिरीतील 19 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यांची आरोग्य तपासणी करून त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. मात्र विद्यार्थी सुखरूप घरी पोचल्याने पालकांनी शासनाचे आभार मानले आहेत.   

कोटात अडकलेले 22 विद्यार्थी दाखल राजस्थान कोटा येथून जिल्ह्यातील 22 विद्यार्थ्यांना एसटीतून जिल्ह्यात सुखरूप आणण्यात आले. हे विद्यार्थी शिक्षणासाठी कोटा येथे गेले होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउमध्ये ते अडकले होते. त्यांना महाराष्ट्रात आणण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. त्यानुसार आज ते रत्नागिरीत दाखल झाले. यामध्ये मंडणगड तालुक्यातील 9, खेड 1, दापोली 2, रत्नागिरी तालुक्यातील 6 आणि सिंधुदुर्ग येथील 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.    

खेड, मंडणगड, दापोली येथील विद्यार्थ्यांना आज सकाळी कळंबणी रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आले. तर रत्नागिरीतील 6 विद्यार्थ्यांची शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले आहे. त्यांची तपासणी झाल्यानंतर त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यात सोडण्यात येणार आहे. धुळे डेपोच्या गाडीने हे सर्व विद्यार्थी आणण्यात आले. ते सुखरूप पोचल्याने पालकांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.