संचारबंदीने घसरला जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख

रत्नागिरी :- लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय अडचणीत आले असताना या लॉकडाऊनमध्ये पोलिसांच्या डोक्याचा गुन्हेगारांचा ताण मात्र कमी झाला आहे. पोलिसांच्या खांद्यावर चेकपोस्ट वर तपासणीचे काम वाढलं असले तरी दुसरीकडे जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख चांगलाच घसरला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात 40 ते 45 टक्के गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला गुन्हेगारीची थोडीशी किनार आहेच. तरी दळणवळणाची साधने वाढल्याने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीशी जिल्ह्याचा थेट संबंध आला आहे. रेल्वे, जलवाहतूक आदींमुळे अनेक मोठ्या गुन्ह्यांमध्ये जिल्ह्याचे नाव किंवा गुन्हेगारांचा समावेश आहे. तरी राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्याचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. अन्य जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्याचा वार्षिक क्राईम रेट आहे, तेवढा रत्नागिरी जिल्ह्याचा वार्षिक क्राईम रेट आहे; मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा गुन्हेगारी क्षेत्राला चांगलाच झटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे देश अडचणीत आहे, मात्र दुसरी जमेची बाजू म्हणजे गुन्हेगारी कमी झाली आहे.

 जिल्ह्यात गेल्या वर्षी 2019 ला मार्च महिन्यात खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, बलात्कार, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, गर्दी मारामारी आदी 25 प्रकारचे 167 गुन्हे घडले होते; मात्र लॉकडाऊनमुळे यामध्ये मोठी घट झाली आहे. मार्च 2020 मध्ये 128 गुन्हे घडले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 39 ने गुन्हे घटले आहेत. एप्रिल महिन्यातदेखील तीच परिस्थिती आहे. सुमारे 40 ते 50 टक्के गुन्हेगारीमध्ये घट झाली आहे. भाग 1 ते 6 म्हणजे जुगार, हत्त्यार अधिनियम, जीवनावश्यक वस्तू, दारूबंदी आदी मार्च 2019 ला 126 गुन्हे घडले होते. मार्च 2020 मध्ये फक्त 81 गुन्हे घडले आहेत. म्हणजे 45 गुन्ह्यांची घट झाली आहे. एप्रिलमध्ये देखील 50 टक्क्यांपेक्षा जास्त गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे. कोरोनामुळे देशात पोलिसांचे काम वाढले आहे. पोलिस नागरिकांच्या संरक्षणासाठी 12 ते 24 तास रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावत आहे. सर्व थरातून पोलिस दलाचे या बद्दल कौतुक होत आहे. हे काम वाढले असले तरी गुन्हेगारीचे प्रमाण घटल्याने त्यांचा पोलिस ठाण्यातील ताण काहीसा कमी झाला आहे.