पुणे, मुंबईच्या रेड झोनमध्ये घरपोच हापूस; रत्नागिरीकरांसाठी धोक्याची घंटा

रत्नागिरी :- शेतमालाच्या नावाखाली मुंबई, पुणे येथील रेड झोन मध्ये रत्नागिरीतून आंब्याची घरपोच विक्री केली जात आहे. काही पैसे जादा मिळत असल्याने गाडी चालक आपला आणि पर्यायाने रत्नागिरीकरांचा जीव धोक्यात घालून हापुसची रेड झोन एरियात वाहतूक करीत आहेत. तसेच या गाड्या रत्नागिरीत परतत असताना काही चाकरमानी लपुनछपून गावी परतत असल्याने रत्नागिरीकरांवर कोरोनाचे सावट घोंघावत आहे.

शासनाने आंब्याच्या वाहतुकीला परवानगी दिली आहे. आंब्याचे मोठे मार्केट पुणे आणि मुंबई भागातच आहे. परंतु सध्या मुंबई आणि पुण्यातच कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. या दोन्ही ठिकाणी असलेल्या रेड झोन एरियापर्यंत आंबा पोच केला जात आहे. सोयटीमधून २० पेट्यांची मागणी असल्यास प्रती पेटी २०० रुपये वाहतूक दर आकारून हा माल मुंबई, पुणे मधील कोरोनाच्या रेड झोन मध्ये घरपोच केला जात आहे. हा माल गाडीवरील ड्रायव्हर, क्लीनर प्रत्येकाच्या घरात नेऊन पोहोच करीत असल्याचे बोलले जात आहे. गावाहून माणूस आल्यावर त्याचे आदरातिथ्य करून चहापाणी केले जात असल्याची माहिती मिळत आहे. हेच चालक आणि मदतनीस पुन्हा रत्नागिरीत येत असल्याचे बोलले जात आहे. येताना काही चालक छुप्या पद्धतीने चाकरमान्यांना गावी आणत आहेत. जाकादेवी येथे अशाच पद्धतीने आलेल्या दोघा चाकरमान्यांना पकडून क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात होऊ नये म्हणून कऱ्हाड मार्गे येणारी भाजीपाल्याची वाहतूक देखील प्रशासनाने बंद केली आहे. मग रेड झोन मध्ये जाऊन येणाऱ्या चालक व मदतनिसापासून कोरोना संक्रमणाचा धोका नाही का ? असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. जिल्ह्यातील गुहागरमध्ये अशा चालकांना कॉरंटाईन करण्यात आले आहे मग इतरत्र हि कारवाई का होताना दिसत नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रत्नागिरीकरांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करून व जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीमुळे आज रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे मात्र अशा गलथानपणामुळे पुन्हा जिल्हा संकटात येऊन त्याचा त्रास येथील नागरिकांना भोगावा लागू शकतो अशी शक्यता आता निर्माण होत आहे.