रत्नागिरी :- जगभरात कोरोनाने धुमाकुळ घातल्यामुळे हापूसच्या निर्यातीवर प्रश्न निर्माण झाला होता. परिस्थितीवर मात करत रत्नागिरी हापूस पुण्यातील विक्रेत्याकडून हैद्राबादमार्गे खासगी विमानाने इंग्लंडला पोचला आहे. 1250 किलो हापूस गेला आहे. यावर्षी कार्गोसाठी तिप्पट भाड्याचा भुर्दंड बसला आहे. गतवर्षीच्या तुलनेत एक महिना उशिराने शिपमेंट गेली आहे.
मार्च महिन्यात कोरोनाने भारतात पाय पसरायला सुरवात केली. त्याचा परिणाम कोकणाच्या हापूस विक्रीवर झाला. यंदा उत्पादन दीड महिना लांबला पण मार्चच्या अखेरीस बागायतदारांची गैरसोय झाली. 25 मार्चला राज्यात लॉकडाऊन झाल्याने वाशी, पुणे बाजार समिती ठप्प होती. राज्यांतर्गत विक्रीवरच संक्रांत आली होती. त्यातून मार्ग काढण्यात कृषी, पणन मंडळाला यश आले. महिना झाला तरीही विमान वाहतुक बंद केल्यामुळे निर्यात सुरु करण्यात अडथळे होते. समुद्रमार्गे आखाती देशांमध्ये सुमारे साडेचार लाख बॉक्स एप्रिल महिन्यात गेले. युरोप, अमेरिकेतील निर्यात सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. त्यासाठी पणनकडून निर्यात केंद्र स्थापन केले होते.
इंग्लंडमध्ये हापूसला मोठ्या प्रमाणात मागणी असते. बाष्पजल किंवा उष्णजल प्रक्रियाकरुन हा आंबा पाठविण्यात येतो. आंबा इंग्लंडला जाण्यासाठी तेथील मराठी विक्रेते तेजस भोसले यांच्याशी संपर्क सुुरु होता. त्यासाठी खासगी कार्गो पाठविण्याचा निर्णय झाला. 279 ते 310 रुपये किलो दराने कार्गोचे भाडे आकारण्यात आले आहे. गतवर्षी 90 रुपये प्रतिकिलो दराने भाडे आकारले होते. पुर्वी प्रवासी विमानातून आंबा जात होता. विमान वाहतूक बंद असल्याने तिप्पट दर आकारला जात आहे. त्यातूनही मात करत रत्नागिरी हापूस बुधवारी (ता. 29) इंग्लंडला पोचला. तिकडेही कोरोनामुळे परिस्थिती गंभीर आहे. मार्केट सुरु असल्यामुळे आंबा विक्री करणे शक्य असल्याचे तेथील व्यावसायिकांचे मत आहे. हापूसचा दर गतवर्षी इंग्लंडमध्ये 12 ते 13 युरो म्हणजे भारतीय चलनानुसार साडेनऊशे ते अकराशे रुपयांपर्यंत होता. यंदा तो सुतारे साडेतेराशे ते चौदाशे रुपयांपर्यंत मिळेल अशी अपेक्षा तेथील व्यावसायिकांकडून वर्तविली जात आहे. दरवर्षी मार्चअखेरीस इंग्लंडला आंबा जातो; परंतु कोरोनामुळे तो एक महिना लांबला आहे. निर्यातीसाठी बेंगलोर, हैद्राबाद, मुंबई विमानतळांचा उपयोग केला जात आहे.