शिक्षक नेत्याने झटकली पोलिस मित्राची जबाबदारी

रत्नागिरी :- कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर पोलिसांच्या मदतीला जिल्ह्यातील काही प्राथमिक शिक्षकांना पोलीस मित्र, आरोग्य मित्र अशा कामांची जबाबदारी दिली जात आहे. टप्प्याटप्प्याने काही शिक्षकांची निवडही केली होती. दुसर्‍या टप्प्यासाठी निवडण्यात आलेल्या काही शिक्षकांनी आपली नावे रद्द केल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

कोरोनाच्या संकटाला संपूर्ण जग पर्यायाने रत्नागिरी जिल्हा सामोरा जात आहे. आरोग्य यंत्रणा, पोलीस बांधव यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. काही ठिकाणी त्यामुळे बाधित होण्याची वेळ यांच्यावर येऊन ठेपली. या यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांना ड्युटी देण्यात आली आहे. कोरोनाच्या लढ्यात अनेक तरुण बांधव पोलीस मित्र म्हणून कार्यरत होते. काहीजण सर्वेक्षण करताना दिसत आहेत. अशा स्थितीत दुसर्‍या टप्प्यात नवीन यादी तयार करण्यात आली. यावेळी काही नेते मंडळींनी हे काम ऐच्छिक असल्याने आपण करायचे नाही, अशी माहिती शिक्षकांना दिली. शिक्षकांचा कैवारी म्हणवून घेताना आतल्या मार्गाने आपली ड्युटी रद्द करण्यासाठी खास वजन खर्ची घातले.

बहुतांशी शिक्षक या कामी हजर झाल्यावर या नेत्याने वेगळीच शक्कल लढवली व अत्यावश्यक सेवेसाठी हजर न होता आपले वजन खर्च करून ही ड्युटी येऊ नये म्हणून ’देव’ पाण्यात बुडवून ठेवले होते. पोलिस मित्रसाठी निवड ही बाब ऐच्छिक असल्याचे सांगून आपले नाव यादीतून काढून घेतल्याचे पुढे येत आहे.
काही तालुक्यातील 50 वर्षे वयावरील शिक्षक या कामी कार्यरत असताना मर्जीतील नेत्यांना मात्र प्रशासनाने वरदहस्त दाखवून सामान्य शिक्षकांना कामाला लावले आहे. वयानुसार यादी तयार करण्यात आली असता कर्तव्य चुकारपणा करणार्‍यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारणे आवश्यक आहे. याबाबतीत वरिष्ठ पातळीवर हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सर्वसामान्य शिक्षकांना एक न्याय तर मर्जीतील नेत्याला सवलत या भुमिकेबद्दल तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.