लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या खलाशांना पर्ससीन संघटनांनी दिला मदतीचा हात

रत्नागिरी :- लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या खलाशांची परिस्थिती गंभीर असताना रत्नागिरीत पर्ससीन नेट मच्छिमार नौकांवर काम करणार्‍या हजारो खलाशांना पर्ससीन मच्छिमारांच्या दोन्ही संघटनांनी हात देत संयमाने परिस्थिती हाताळली. इतर भागात गाव गाठण्यासाठी कायदा सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असताना रत्नागिरीत मात्र पर्ससीन मच्छीमार संघटनांनी दिलेला मदतीचा हात खलाशांसाठी आधाराचा ठरला.

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पर्ससीन नेट मासेमारीसह सर्वच प्रकारची मासेमारी बंद झाली. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 24 मार्चपासून अचानक लॉकडाऊन झाल्याने शेकडो पर्ससीन नौकांवर काम करणार्‍या परराज्यातील खलाशांना त्यांच्या गावी पाठविणे शक्य नव्हते. त्याचवेळी त्या खलाशांमध्ये अस्थिरता निर्माण होवू न देणे हे सुध्दा मोठे आव्हान होते. रत्नागिरी तालुका पर्ससीन मच्छिमार मालक असोसिएशन व जिल्हा मच्छिमार संघाचे पदाधिकारी विकास उर्फ धाडस सावंत, नासिरशेठ वाघू, प्रतिक मोंडकर, जावेद होडेकर, किशोर नार्वेकर, नुरूद्दीन पटेल, मजहर मुकादम आदींची तातडीची बैठक झाली. 
पर्ससीनच्या दोन्ही संघटनांनी विचारपूर्वक काही महत्त्वाचे निर्णय घेवून ते अंमलात आणले. परिणामी ते हजारो खलाशी बोटीवरच राहिले.

संघटना पदधिकार्‍यांनी बैठकीत ठरविल्याप्रमाणे सर्व पर्ससीन नेट नौका बंदरापासून काही अंतरावर समुद्रात नांगरून ठेवल्या. त्यामुळे लॉकडाऊन काळात खलाशांना बाहेर येवून फिरता येणे शक्य झाले नाही. त्यांना जेवणासाठी सर्व अन्नधान्य व इतर आवश्यक वस्तूंचा नौकेतच पुरवठा करून देण्यात आला. त्याचबरोबर मासेमारीचे काम नसतानाही खलाशांना ठरल्याप्रमाणे आठवड्याचा पगार किंवा हफ्ता वेळच्यावेळी देण्यात आला. त्यामुळे या खलाशांनी आपापल्या घरी जाण्यासाठी कोणतीही कुरबूर केली नाही. 

मासेमारीसाठी नौकांना समुद्रात जाण्याची शासनाने नुकतीच परवानगी दिली आहे. शासनाचे निकष पाळून पर्ससीन नेट नौका आता केंद्र शासनाच्या अधिकार क्षेत्रातील साडेबारा नॉटीकल मैल बाहेर जावून मासेमारी बंदी होती. मासेमारीच्या हंगामातील चार महिन्यापैकी सुमारे अडीच महिने नैसर्गिक आपत्तीमुळे नौका मासेमारीसाठी समुद्रात जावू शकल्या नाहीत. जी काही कमी काळ मासेमारी झाली तीही अपेक्षित मासळी न मिळाल्याने तोट्याचीच होती. त्यात लॉकडाऊनमुळे मासेमारी बंद असतानाही खलाशांची व्यवस्था करण्यासाठी मोठा खर्च झाला. अशाही परिस्थितीत संयमपूर्वक खलाशांना हाताळून लॉकडाऊन काळात नियम अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या पर्ससीनच्या दोन्ही संघटनांचे कौतुक होत आहे.