महासंचालकाकडून विशेष सेवा पदक जाहीर
रत्नागिरी :- पोलीस दलात पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा बजावणाऱ्या तसेच नक्षलग्रस्त भागात दोन किंवा त्यापेक्षा अधिककाळ सेवा बजावणाऱ्या जिल्हा पोलिस दलातील दोन अधिकारी आणि तेरा कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकाकडून विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल लक्ष्मण लाड, सावर्डेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गणपत लाड यांच्यासह 13 कर्मचाऱ्यांना हे पदक जाहीर झाले आहे.याबाबतची घोषणा महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली.
यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 1 पोलीस निरिक्षक, 1 सहाय्यक पोलीस निरिक्षकांचा समावेश आहे. तर 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये पंधरा वर्षांच्या सेवेबद्दल पोलीस निरीक्षक अनिल लाड, क्लिष्ट आणि थरारक बहुचर्चित गुन्ह्यांची उकल करून खटले दाखल केल्याबद्दल सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत गणपत लाड, सेवेत 15 वर्ष उत्तम काम केल्याबद्दल सहायक पोलिस उपनिरीक्षक दीपक तुकाराम साळवी आणि अनिल सदाशिव मोरे यांना, जनतेच्या समस्या सोडवून पोलिसांची प्रतिमा उजळवणाऱ्या पोलीस हवालदार रमेश रतन चव्हाण, 15 वर्ष उत्तम सेवाभिलेख असलेल्या पोलीस हवालदार किशोर रघुनाथ जोशी, मेधा रवींद्र बोंद्रे दीपक काशिनाथ जाधव, उदय संभाजी भोसले, संतोष यशवंत सावंत, घनश्याम गोविंद वाघाटे, सागर चंद्रकांत साळवी, विजय तानाजी आंबेकर, संजय गोपाळ वाघाटे संदीप सुरेश नाईक यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे.