स्थानिक ग्रामस्थांसोबत चर्चा करूनच चाकरमान्यांना गावात आणणार – ना. सामंत

रत्नागिरी :- मुंबईतील चाकरमान्यांना त्यांच्या मूळ गावी आणण्यापूर्वी येथील ग्रामस्थांशी चर्चा करण्यात येणार आहे. स्थानिक ग्रामस्थ व मुंबईकर यांच्यामध्ये समन्वय साधल्यानंतरच सरकार चाकरमान्यांना कोकणात आणण्याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे. अद्यापपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. राजकीय विरोधक सोशल मिडियाच्या माध्यमातून ग्रामस्थ, चाकरमान्यांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा प्रयत्न सरकार हाणून पाडेल. कोणताही निर्णय घेताना दोघांच्याही सुरक्षिततेची दक्षता  घेतली जाणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
लॉकडाऊनपूर्वी जिल्ह्यात १ लाख १६ हजार मुंबईकर आले आहेत, ते कोरोनाच्या भितीने आलेले नसून शिमगोत्सव आले होते. लॉकडॉऊननंतर ते येथेच अडकले आहेत. तर मुंबईतून तब्बल २ ते ३ लाख चाकरमानी कोकणात येण्यासाठी इच्छुक असले तरी त्यांना आणण्यापूर्वी सरकारला काही बाबी तपासून पहाव्या लागणार आहेत. दि. ३ मे नंतर मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे याबाबत योग्य तो निर्णय घेतील. स्थानिक ग्रामस्थांसह मुंबईकरांनी विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नये असे आवाहन ना.सामंत यांनी केले.जिल्हा स्तरावर आवश्यक सोयी-सुविधांची चाचपणी सुरू आहे. एकाचवेळी चाकरमान्यांना आणल्यास त्यांचे संस्थात्मक विलगीकरण कुठे करायचे याची माहिती संकलित केली जात आहे. याचा अर्थ चाकरमान्यांना आणण्याचा निर्णय झाला आहे असे होत नाही. परंतु  सरकार कोणालाही वार्यावर सोडणार नाही, प्रत्येकाची काळजी घेईल असे ना.सामंत यांनी सांगितले.