रत्नागिरीत अवकाळी पावसाची हजेरी; तापमानात घट

रत्नागिरी :- हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार बुधवारी सायंकाळी पासून अवकाळी पावसाचे ढग संपूर्ण जिल्ह्यात जमा झाले. अवघ्या काही मिनिटात उष्म्याची जागा थंड वार्‍याने घेतली. सोसाट्याचे वारे सुटले. चिपळूण, संगमेश्वर, देवरुख, रत्नागिरी तालुक्यातील निवळीसह ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली. रत्नागिरी शहरातदेखील काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली आणि उष्म्याने हैराण रत्नागिरीकरांना दिलासा मिळाला. 

मागील काही दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तापमान 35 अंशापर्यंत पोहचल्याने रत्नागिरीकरांच्या अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. अशातच अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीने सर्वानाच दिला. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने आणि गारांसह हजेरी लावली होती. संगमेश्वर पट्ट्यात गारांचा पाऊस पडला होता. अशातच बुधवारी अवकाळी पाऊस ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह हजेरी लावेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.बुधवारी सायंकाळी चार वाजता आकाशात काळे ढग अचानक दाटून आले. सोसाट्याचा वारा देखील सुटला. जिल्ह्यतील चिपळूण, संगमेश्वर, देवरुख, लांजा, राजापूर येथे पावसाने हजेरी लावली. रत्नागिरी तालुक्यात ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली. रत्नागिरी शहरात मोठ्या प्रमाणात अंधारून आले, सोसाट्याचा वारा सुटला मात्र पावसाच्या धारा काही प्रमाणातच कोसळल्या. 10 मिनिटं हजेरी लावून पावसाने काढता पाय घेतला.