रत्नागिरी :- जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात नागरिकांना मास्क अत्यावश्यक केले असून त्याची अंमलबजावणी केली नाही तर पाचशे रुपये दंड केला जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत कडक भूमिका घेतली आहे.
शासनाने करोना विषाणूचा ( कोवीड – 19 ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. मात्र सदर आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील नागरीकांनी अत्यावश्यक सेवा उपलब्धतेसाठी घरामधुन बाहेर पडताना व परत घरी येईपर्यत संपुर्ण कालावधीत चेह-यावर मास्क परिधान करणे बंधनकारक राहिल, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. त्याची अंमलबजावणी बरेचसे नागरीक करत नाहीत. मास्कचा वापर न करता विनाकारण रत्यावर फिरतात. त्याची गंभीर दखल जिल्हाधिकारी यांनी घेतली आहे
यापुढे जिल्ह्यातील शहरी किंवा ग्रामीण भागामध्ये घराबाहेर पडलेनंतर सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी मास्कचा वापर न केल्याचे आढळल्यास अशा व्यक्तीकडून 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. हा दंडाची आकारणी करण्याचे अधिकार ग्रामस्तरावर ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी तर शहरी भागातील संबंधीत नगरपालिका किंवा नगरपंचायत कर्मचारी यांना आहेत. तसेच याबाबत इतर विभागाच्या कर्मचा-यांनी सबंधीत भौगोलीक क्षेत्रात दंडाची वसुली केल्यास ती त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जमा करणे बंधनकारक राहिल. या आदेशाचे उल्लंघन अथवा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आले तर सबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कारवाई केली जाईल अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी काढल्या आहेत.