जेलची हवा खाण्यासाठीही कैद्यांवर निर्बंध 

कोरोनामुळे जेलमधील नियमात बदल

रत्नागिरी :- कोरोनाने सर्वसामान्य हैराण झाले असताना आता तर कारागृहातील कैद्यांनाही या कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोनामुळे कैद्यांवरही बंधन घालण्यात आली आहेत. कारागृहातील अंतर्गत मोकळेपणा आता कोरोनाने हिरावून घेतला आहे. संसर्ग रोखण्यासाठी या सगळ्यांवर निर्बंध आले आहेत. मास्क, हॅण्डवॉश वापरणे सक्तीचे केले असून सोशल डिस्टन्स ठेवून आपला दिनक्रम चालू ठेवण्याची वेळ कैद्यांवर आली आहे. यामुळे कैद्यांना जेलची हवा खाणे देखील दुरापास्त झाले आहे.

रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहामध्ये सध्या 150 कच्चे-पक्के कैदी आहेत. त्यामध्ये सुमारे 10 महिलांचा समावेश आहे. या कैद्यांची दिनचर्या तशी वेगळीच होती. दररोज सकाळी एकत्र येऊन आपापल्या बराकमधील पाणी भरणे, त्यानंतर आंघोळीसाठी स्नान ओटीवर एकत्र येणे, नाष्टा, जेवण्यासाठी एकत्र येणे. बंधने असली तरी कारागृहातील हा मोकळेपणा सर्व कैदी अनुभवत होते. परंतु कोरोनाने या सर्वांवर बंधने आली आहेत. कारागृह अंतर्गत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते अशा कैद्यांना 45 दिवसाच्या पॅरोलवर (रजेवर) सोडण्यात आले आहे. रत्नागिरी विशेष कारागृहातील 20 कैद्यांना त्याचा फायदा झाला. मात्र तरी 150 कच्चे-पक्के कैदी अजून कारागृहात आहेत.

त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी कारागृह प्रशासनाने घेतली आहे. प्रत्येकाला मास्क, बराकमध्ये हॅण्डवॉश, सोशल डिस्टन्स आदींची सक्ती केली आहे. नेहमीच्या मोकळेपणावर काहीशी बंधने घालण्यात आली आहेत. त्यामध्ये बराकमधील पाणी भरण्यासाठी सकाळी एकत्र येण्याऐवजी एका-एकाने यायचे आहे. स्नान ओटीवर देखील गर्दी न करता एका-एकाने अंघोळ करायची आहे. त्यानंतर नाष्टा, जेवण करताना योग्य तो सोशल डिस्टन्स ठेवायचा आहे, अशी अनेक बंधने आता कोरोनामुळे कैद्यांना घालण्यात आली आहेत. एवढेच नव्हे तर कैद्यांच्या मुलाखती बंद केल्या आहेत. कोणाला आत किंवा बाहेर जाण्यास बंदी घातली आहे.