रत्नागिरी :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुंभार्ली घाटातील वाहतूक 2 मे पर्यंत बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्यात सर्वत्र मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले असून मास्क न वापरणाऱ्याला 500 रुपये दंड करण्यात येणार आहे.
जिल्ह्यालगत असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात कोरोनाचा फैलाव होत आहे. या भागातून फळे, भाजीपाला, कोंबडया, बकऱ्या आणि अंडी यासह खाद्यपदार्थ वाहतूक कुंभार्ली घाटातून चिपळूण तालुक्यात होते. कोरोना विषाणूचा संसर्ग या वाहतुकीमुळे होण्याची शक्यता असल्याने 2 मे 2020 पर्यंत या घाटातून या स्वरुपाची सर्व वाहतूक रोखण्याचा आदेश जारी करण्यातआला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच नागरिकांनी सर्व ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. सक्तीच्या या आदेशाचे पालन न करता अनेकजण विना मास्क फिरत आहेत. अशा सर्वांना प्रत्येक प्रसंगी 500 रुपये दंड करण्याचा आदेश प्रशासनाने जारी केला आहे.
जिल्ह्यात तपासणीसाठी 596 नमुने घेण्यात आले. यापैकी 6 पॉझिटिव्ह, 572 निगेटिव्ह अहवाल आले आहेत. जिल्हयात होम क्वारंटाईनखाली असणाऱ्यांची एकूण संख्या 1118 आहे.