स्मॉल स्केल इंडस्ट्रीज संघटनेतर्फे मागणी
रत्नागिरी :- तालुक्यातील मिरजोळे आणि झाडगाव औद्योगिक क्षेत्रातील लहान व्यवसायिकांना व्यवसाय सुरु करण्याची परवानगी शासनाने द्यावी अशी मागणी लघुउद्योग संघटनेतर्फे करण्यात आली आहे. लहान उद्योगातील कामगार आस्थापना अल्प असल्यामुळे त्यांना दररोज येऊन-जाऊन काम करण्याची मुभा मिळावी अशी मागणी केली असून ते निवेदन स्मॉल स्केल इंडस्ट्रीज संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
हे निवेदन देताना प्रभारी उपाध्यक्ष मरिनर दिलीप भाटकर, सचिव राजेंद्र सावंत, सदस्य दिगंबर मगदूम, प्रादेशिक अधिकारी श्री. पडळकर साहेब व उप अभियंता बी. एन. पाटील उपस्थित होते.लघुउद्योग संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर 23 एप्रिलला जिल्हा प्रशासनाबरोबर चर्चा झाली. 20 एप्रिलपासून काही उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी नियमावलीत शिथिलता देण्यात आली आहे. 17 एप्रिलच्या शासन आदेशात औद्योगिक आस्थापना सुरु करण्यासंबंधी मार्गदर्शक तत्वेही दिली आहे. ग्रामीण भागातील म्हणजेच पालिका क्षेत्राबाहेरील उद्योग व्यवसाय सुरु करण्याचे निर्देश आहेत. रत्नागिरी येथे मिरजोळे व झाडगांव अशा दोन औद्योगिक वसाहती महामंडळाने विकसित केलेल्या असून दोन्ही वसाहती ग्रामीण क्षेत्रात येतात. त्यामुळे येथील सुक्ष्म, लघु व मध्यम स्वरुपाचे उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने निणय घेतला पाहीजे.
व्यवसाय सुरु करावयाचा झाल्यास तेथील कामगारांना निवासासह जेवण आदी सर्व सोई व्यवसायाच्या परिसरात पुरविण्याची प्रशासनाची अट आहे. तथापि येथील लहान व्यवसायिकांकडे प्रत्येकी साधारणतः 6 ते 10 कामगार काम करतात. त्या आस्थापनेमध्ये कामगारांना रहाण्याची सोय उपलब्ध नाही. कामगारांना नाश्ता चहापान व दोन्ही वेळेचे जेवण पुरविणे येथील लहान व्यवसायिकांना शक्य होत नाही. येथील लहान व्यवसायिकांकडे काम करणारा कामगार बहुतांशी स्थानिक असुन 8 ते 10 किलोमीटरच्या परिसरातील असतो. तो स्वत:च्या सायकलने किंवा मोटारसायकलने कारखान्यात येतो. आपल्या कामगारांना विशेष वाहनाव्दारे नेण्या-आणण्याबाबत पर्याय विचारात घेता एकाच कारखान्यातील कामगार परस्परापासुन विखुरलेल्या आणि दुर-दुर अंतरावर रहात असल्यामुळे वाहन सर्वत्र फिरविणे शक्य नाही. तसेच वाहनात परस्पर अंतर राखण्याच्या नियमनामुळे जीप सारख्या एका चार चाकी वाहनात चालकाखेरीज फक्त एक अथवा दोन व्यक्ती व्यक्ती प्रवास करु शकतील. शिवाय अनेक व्यवसायिक मालक स्वतःच मोटारसायकलने कामासाठी सर्वत्र फिरत असल्यामुळे त्यांना कामगारांसाठी स्वतंत्र चारचाकी वाहन पुरविणे शक्य नाही.शासनाच्या आदेशानुसार मच्छीमारी ट्रॉलर्स सुरु झाले आहेत. ट्रक, टेम्पोव्दारे रस्ते वाहतुकही सुरु आहे. ट्रॉलर्सना आवश्यक यांत्रिक दुरुस्ती कामांसाठी ट्रक, टेम्पोची गरज भासते.
त्याचप्रमाणे शासकीय तसेच खाजगी इमारत बांधकाम क्षेत्रासाठी लागणार्या ब्रिक्स, ग्रील्स अशा स्वरुपात येथील लहान कारखान्यामधून वस्तू पुरविल्या जातात. त्यात पॅकेजिंग, प्रिंटीग, विद्युत उपकरणांची दुरुस्ती अशा अन्य कामांचाही समावेश आहे. लहान उद्योगात काम करण्यार्या कामगारांना तसेच हे उद्योग चालविणार्या व्यवसायिकांना त्यांच्या हिताचे दृष्टीने व व्यवसायाच्या दृष्टीने असे व्यवसाय चालु करणे अत्यंत गरजेचे आहे. कामकाजाच्या गरजेनुसार अथवा किमान 50 टक्के कामगारांना कामासाठी कारखान्यात बोलावून तेथील लहान उद्योजक कारखाना सुरु करण्यास तयार आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यक नियमावलीनुसार खबरदारी घेण्यास सर्व उद्योजक तयार आहेत. वरील सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करुन लहान उद्योग आस्थापनेतील अल्पसंख्येत असलेल्या कामगारांसाठी दररोज येऊन जाऊन काम करण्याची मुभा मिळावी. उद्योजक आपल्या उद्योगाविषयी व कामगारांविषयी आवश्यक सर्व तपशील औद्योगिक महामंडळाच्या कार्यालयाला सादर करतील आणि त्यानुसार महामंडळातर्फे कामगारांना ये-जा करण्यासाठी पास वितरीत करण्याची सुविधा द्यावी.