जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्या वाढून 17 वर

रत्नागिरी :- जिल्ह्यात मुंबई, पुणे, कोल्हापूरातून येणार्‍याची संख्या वाढत आहे. सर्दी, खोकला आदी संशयित रुग्णही दाखल होत आहेत. कोरोनाचा एक अहवाल प्रलंबित असल्याची माहिती पुढे येत असतानाच सायंकाळी 17 अहवाल प्रलंबित असल्याचा आकडा प्रशासनाने दिला. यावरून जिल्ह्यात बाहेरून येणार्‍यांची संख्या वाढत आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालयातील 13 अहवाल कालपर्यंत प्रलंबित होते. त्यापैकी 12 जणांचा अहवाल आज प्राप्त झाला असून ते निगेटिव्ह आहेत. एक प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. मात्र सायंकाळी जिल्हयात तपासणीसाठी घेण्यात आलेले नमुने 565 होते. एकूण आलेले निगेटिव्ह अहवाल 540 आहेत, नाकारलेल्या स्वॅबची संख्या 2 असून 17 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्हयात होम क्वॉरंटाईन केलेल्यांची संख्या 1 हजार 118  आहे. संस्थात्मक क्वॉरंटाईन 605 आहेत. परप्रांतातून आलेल्या आणि जिल्हयात थांबलेल्या व्यक्तींसाठी जिल्हयात 63  निवारागृहे सुरु करण्यात आली आहेत. यात 192 जणांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोना मुक्तीच्या वाटेवर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे. तरी लॉकडाउन वाढल्याने कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात येणार्‍यांची संख्या वाढत आहे. आज नव्याने जिल्ह्यात आलेल्या 17 जणांचे अहवाल प्रलंबित राहिले आहेत. त्यामध्ये सर्दी, खोकला असलेल्या काही संशयितांसह मुंबई, पुणे, कोल्हापुरातून येणार्‍यांची संख्या वाढत आहे. काही लोक चालत देखील येत आहे. त्यांना आडवून संशयित म्हणून दाखल केले जात आहेत. यामुळे कोरोना संशयितांच्या नमुन्याच्या अहवालाचा आकडा वाढत आहे. याला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दुजोरा दिला.