रत्नागिरी :- जिल्हा कोरोनामुक्त होत असल्याचे एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. कोकणातला कोकणी बांधव मोठ्या प्रमाणावर मुंबईत आहे आणि मुंबईकरांना या कठीण कालखंडात कोकणात परतण्याची आस लागणे स्वाभाविक आहे.
रत्नागिरीमध्ये कोरोनाचं उच्चाटन होत आहे. मात्र सद्यस्थितीत आंबा वाहतूक तसेच अन्य मार्गांनी छुप्या पद्धतीने मुंबई अथवा अन्य शहरातून नागरिक रत्नागिरीमध्ये येत असतील आणि ही बाब शासकीय यंत्रणेपासून दडवून राहत असेल तर रत्नागिरी मध्ये कोरोना संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो, असे प्रतिपादन भा.ज.पा अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
बाहेर गावातून आलेले नागरिक हे कोरोना विषाणूंचे मार्गक्रमण असू शकतात म्हणून प्रशासनाने लॉक डाऊन डावलून रत्नागिरीमध्ये प्रवेश करणाऱ्या नागरीकाचा प्रवेश प्रतिबंधित करण्यासाठी कठोर उपाययोजना करावी तसेच नागरिकांनीही जागरूक रहात आपल्या गावात, आपल्या भागात असे बाहेर शहरातून आलेले नागरिक निदर्शनास आल्यास प्रशासकीय यंत्रणेला त्या बाबत माहिती दयावी.
मुंबईतून कोकणी माणसाला कोकणात आणायचं असेल तर त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करून भागणार नाही तर त्यांचा स्वतंत्र रहिवास त्यांची वैद्यकीय तपासणी आवश्यकता पडल्यास वैद्यकीय सुविधा पुरवणारी हॉस्पिटल्स याची तयारी आधी करणे आवश्यक आहे. मुंबईकर कोकण वासियांना कोकणात आणण्यास विरोध नाही मात्र त्याच पूर्व नियोजन अपरिहार्य ठरेल अन्यथा सर्वांसाठीच हे धोकादायक असेल असे परखड मत भा.ज.पा अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केले.