कोरोना विरुद्ध लढ्यासाठी जिल्ह्यात दहा हजार वॉरियर्स

रत्नागिरी :- परजिल्ह्यांसह परदेशातून आलेल्यांवर लक्ष ठेवणे, त्यांची तपासणी करणे आणि गावागावात सुरक्षिततेसाठी जनजागृती करणे यासाठी जिल्हा परिषदेने दहा हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची कोरोना वॉरिअर्स म्हणून वाडी-वस्त्यांवर नेमणूक केली आहे. त्यात जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविकांचा समावेश आहे. 

मार्च महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर जिल्हा परिषद यंत्रणा कार्यान्वित झाली. गेल्या महिन्याभराच्या कालावधीत घेतलेल्या मेहतनीमुळे जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे. कोरोनाचे सावट निर्माण झाल्यापासून शहरातून मोठया संख्येने लोक ग्रामीण भागात येत होते. आतापर्यंत सुमारे दीड लाख लोकांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले. गाव, वाडी-वस्तीवर कार्यरत कर्मचार्‍यांनी केले. इन्स्टीट्युशनल क्वारंटाईनसाठी ग्रामीण भागातील चाळीसपेक्षा अधिक ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यात जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल, महाविद्यालय, हॉस्टेल्स तसेच मदरशांचा समावेश आहे. जिल्हा आरोग्य विभागात पाठपुरावा कक्ष (फिड बँक सेंटर) निर्माण करण्यात आला. त्या ठिकाणाहून दररोज किमान दिडशे ते दोनशे फोन केले जात आहेत. त्याद्वारे क्वारंटाईन लोकांना भेटी दिल्या जातात ना, कार्यक्षेत्रात काम करणारे कर्मचारी स्वतःची पूरेशी काळजी घेतात का, कर्मचार्‍यांना कार्यक्षेत्रात काही अडीअडचणी येतात का याची चौकशी केली जाते. घरो-घरी पाहणी करुन गावकर्‍यांना कोणत्या आजाराचा त्रास होत नाही ना याची नोंद घेतली जात आहे. खाजगी वैद्यकिय व्यावसायीकांकडे येणार्‍या रुग्णांची नोंद केली जात असून सर्दी, खोकला किंवा ताप असणार्‍या रुग्णांचाही पाठपुरावा आरोग्य कर्मचारी करत आहेत. त्याचा अहवाल तालुक्यांकडून जिल्ह्याला आणि जिल्ह्यामार्फत शासनाला नियमित सादर केला जातो. 

जिल्हा परिषदेचे नियमित डॉक्टर्स 121, औषध निर्माण अधिकारी 42, आरोग्य पर्यवेक्षक 18, आरोग्य सहाय्यक 150, आरोग्य सेवक 235, आरोग्य सहाय्यिका 56, आरोग्य सेविका 345, आरोग्य सेविका कंत्राटी 101, अंगणवाडी सुपरवायजर 94, अंगणवाडी सेविका 2776, मदतनिस 2100, गटप्रवर्तक 69, आशा 1285, राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी 63, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत 35, ग्रामसेवक 764, तलाठी 344, ग्रामपंचायत कर्मचारी 1,370 जिल्हा परिषदेचे इतर विभागातील कर्मचारी 30 कार्यरत आहे.