हापूस पाठोपाठ काजू व्यवसायदेखील अडचणीत

रत्नागिरी :- हापूसच्याबरोबरच कोकणातील दुसरे महत्त्वाचे पिक असलेल्या काजूला कोरोनाचा फटका बसलेला आहे. प्रक्रिया केलेल्या काजूगरांच्या विक्रीसाठीची मुख्य बाजारपेठ असलेल्या मुंबई, पुणे शहरांसह सर्वाधिक निर्यात होणार्‍या अमेरिकेत कोरोनाचा धुमाकुळ सुरु आहे. काजूगरांना ग्राहकांची कमतरता असून विविध सोहळे रद्द झाल्याने विक्री यंत्रणा कोलमडली आहे. परिणामी काजू बीचे दर घसरले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात 65 ते 90 रुपये किलो दराने बी खरेदी होत असल्याने काजू उत्पादकांची पंचाईत झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 65 हजार हेक्टरवर काजूची लागवड आहे. काजू व्यवसायातून जिल्ह्यात कोट्यवधींची उलाढाल होते.  रत्नागिरीतील काजू बीला 65 ते 90 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्यातही वेंगुर्ले जातीच्या काजूला 90 ते 110 रुपये किलोचा दर आहे. गावठी काजू बीचा दर मात्र यंदा खालीच आहेत.
दर कमी असल्याने उत्पादक अडचणीत आले असून ग्राहक नसल्याने प्रक्रियादार हादरले आहेत. कोरोनाचे संकट वाढतच असल्याने कच्चा माल खरेदी करताना व्यावसायिक जपून पावले उचलत आहेत. लग्नसराई, यात्रा, पर्यटन आदी बंद आहेत. कच्या मालावर प्रक्रिया केल्यानंतर काजूगरांना खरेदीदार मिळणे ही समस्याच आहे. मुंबई, पुण्यातील बाजारपेठेत काजूगर खरेदीदार अत्यल्प आहेत. त्यामुळे प्रक्रियायुक्त काजूचा दर  दोनशे ते अडीचशेनी घसरल्याचे प्रक्रियादारांचे म्हणणे आहे.