जिल्ह्यातील सात हजार ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा

रत्नागिरी :- जिल्ह्यात पाणीटंचाईची तिव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सहा तालुक्यातील 44 वाड्यांना आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु झाला आहे. सुमारे सात हजार लोकांना टंचाई जाणवत असून आतापर्यंत 325 फेर्‍या झाल्या आहेत. मागील आठवड्यात दोन तालुक्यातील 15 वाड्यांची भर पडली आहे.
उष्मा दिवसेंदिवस वाढत असून दिवसा पारा 37 अंश सेल्सिअस तर रात्री पारा 24 अंश सेल्सिअसपर्यंत राहतो. तापमान वाढल्यामुळे दिवसेंदिवस पाण्याचे बाष्पीभवन होत असून पाणी पातळीत घट होऊ लागली आहे. यंदा पाऊस उशिरापर्यंत लांबल्यामुळे टंचाईची तिव्रता वाढणार नाही अशी शक्यता होती. त्यानुसार दरवर्षीच्या गावे, वाड्यांना पाणी टंचाई जाणवत असून टँकरची व्यवस्था प्रशासनाला करावी लागत आहे. काही वाड्यांचे प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत. एप्रिल अखेर आणि मे महिन्यात सर्वाधिक टँकरची मागणी होती. जिल्ह्यात रत्नागिरी, राजापूर आणि गुहागर या तिन तालुक्यांमध्ये टँकरची मागणी झालेली नाही. सर्वाधिक टंचाई खेड, चिपळूण, संगमेश्‍वर तालुक्यातून आहे. त्या पाठोपाठ मंडणगड, दापोली, लांजा तालुक्यांचा लागतो. गेल्या आठवड्यात दोन हजार लोकांकडून मागणी वाढली असून पुढील आठवड्यात त्या भर पडणार आहे.