रत्नागिरी :- मुंबई, पुणे आदी ठिकाणचे चाकरमानी जिल्ह्यात येण्यास इच्छुक आहेत. त्यांना सुरक्षितरीत्या गावात पोचविण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्या अनुषंगाने सर्व परिस्थितीचा अभ्यास करून आणि नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन चाकरमान्यांना जिल्ह्यात आणण्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे. काय उपाययोजना, कोणती आखणी करण्याची गरज आहे, आदीबाबत आज जिल्हा प्रशासनाशी बैठक सुरू आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोणाचा एकही रुग्ण नाही. तरीही दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉ. जांभूळकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ४० नर्सेस, वॉर्डबॉय, सफाई कामगार , सुरक्षा रक्षक यांची टीम देवदूत प्रमाणे काम करत आहे.त्यांच्यामुळेच आपण कोरोना मुक्त झालो आहोत. ही स्थिती कायम ठेवण्याची यापुढील जबाबदारी रत्नागिरांची आहे.त्यांनी शासनाच्या सर्व नियमांचे यापुढेही तंतोतंत पालन करावे असे आवाहन ना.सामंत यांनी केले.
मुंबईस्थित असलेल्या चाकरमान्यांना आपल्या मूळ गावी येण्याची इच्छा आहे.याबाबत सरकार चर्चा करून धोरण निश्चित करणार आहे. प्रत्येकाला सुरक्षितरित्या आपल्या मूळ गावी आणतानाच येथील जनतेची सुरक्षा अबाधित राहील यासाठी आवश्यक उपायोजना करण्यात येणार आहेत. परंतु याचे राजकारण काहीजण करत आहेत. हा प्रयत्न हाणून पाडला जाईल असा इशाराही ना.उदय सामंत यांनी दिला. अभ्यासांती चाकरमान्यांना कोकणात परतण्याचा निर्णय शासन जाहीर करणार असल्याचे सांगत चाकरमानी घाबरून जाऊ नये असे आवाहनही ना. सामंत यांनी केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ५४७ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी ५२५ जण निगेटिव्ह ६ पॉझिटिव्ह २ रद्द तर १३ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत ३१ जण आयसोलेशन कक्षात उपचार घेत आहेत. ग्रामीण भागात किरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नर्सेस, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका उत्तम काम करत आहेत ग्रामीण भागात धोरणाचा प्रादुर्भाव रोखण्यात यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचेही ना.सामंत यांनी आवर्जून सांगितले.