कोकणच्या राजाची लवकरच हवाई सफर; चार्टर प्लेनने हापूस युरोपवारीवर

रत्नागिरी :- कोरोनामुळे हापूसच्या स्थानिकस्तरावरील खरेदी-विक्रीबरोबरच निर्यातीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. त्यातून व्यावसायिक सावरले असून समुद्रमार्गे आखाती देशांमध्ये निर्यात सुरु राहीली. आता कोकणाचा हापूस वाशीतून हवाई मार्गे युरोपमध्ये युकेला पाठविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सुमारे पाचशे पेटी येत्या दोन दिवसात चार्टर प्लेनने रवाना होणार आहेत. याला वाशीतील व्यावसायिक संजय पानसरे यांनी दुजोरा दिला आहे.

कोरोनामुळे परदेशात जाण्यासाठीची सर्व वाहतुक थांबविण्यात आली होती. समुद्रमार्गे माल वाहतुक सुरु ठेवण्यात आली. काही कालावधीनंतर विमानाने परदेशात मालवाहतूक सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा फायदा कोकणातील हापूसला होण्याची शक्यता आहे. समुद्रमार्गे आतापर्यंत आखाती देशात चार लाखाहून अधिक पेटी आंबा पाठविण्यात व्यावसायिकांना यश आले आहे. कोरोनामुळे कोकणातील सिमा सिल केल्याने वाहतुक थांबली होती. विविध प्रयत्नानंतर शासनाने शेतमाल वाहतुकीला परवानगी दिली. त्यामुळे कोकणातील हापूसचा मार्ग मोकळा झाला. वाशीमधून संयुक्त अरब अमिराती, कुवेतसह त्या देशांमध्ये जहाजातून आंबा रवाना झाला. विमानसेवा सुरु झाल्यामुळे युरोपिय देशात आंबा पाठविण्याची तयारी सुरु झाली आहे. दरवर्षी 20 एप्रिलपर्यंत युरोपसह अन्य देशांमधील निर्यातीला आरंभ होतो. यंदा कोरोनामुळे विलंब झाला असून येत्या दोन दिवसात ही सवारी सुरु होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.