अनधिकृत प्रवासी वाहतूक करणार्‍यांवर कठोर कारवाई: ना.सामंत

रत्नागिरी :- टाळेबंदीमुळे ज्या-त्या ठिकाणी जिल्ह्यातील चाकरमानी किंवा अन्य कामगार वर्ग अडकला आहे. मुळ गावी परतण्यासाठी आसुसलेले आहेत. त्यासाठी कोणताही मार्ग पत्करण्यास ते तयार आहेत. याचाच फायदा घेऊन काही आंबा, मासळी वाहतुकीच्या गाड्यांमधुन जादा कमाईसाठी अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन अनधिकृतपणे अनेकांना जिल्ह्यात घेऊन येत आहेत. अशा वाहतुकीला मज्जाव करणे अत्यावश्यक असून अशा वाहतुकदारांवर कठोर कारवाईचा इशारा ना. सामंत यांनी दिला आहे.  कोरोना विरोधात जिल्ह्यातील 90 ते 95 टक्के नागरिक सहकार्य करीत आहेत. मात्र अवघ्या पाच-दहा टक्क्यातील नागरिकांमुळे प्रशासनापुढे अडचणी येत आहे. 14 एप्रिलनंतर पुन्हा लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. संपूर्ण देश या टाळेबंदीमुळे थांबला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चाकरमानी, कामगार वर्ग जिल्ह्यात परत येण्यासाठी धडपडत आहे. मात्र जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्याने त्यांना जिल्ह्यात येणे शक्य नाही. परंतु त्यातुनही काही लोक पर्याय शोधत आहेत.
काही नागरिक चालत येत आहेत, दुचाकीचा प्रवास करीत आहे, अशी अनेक कारणे पुढे करून जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र पोलिस यंत्रणा सतर्क असल्याने त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडले जात आहे. मात्र शासनाने जीवनावश्यक वस्तूंना ने-आण करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामध्ये आंबा, मासळी, भाजी-पाला आदीचा समावेश. जिल्ह्यातून आंबा आणि मासळी मुंबई, पुणे आदी भागात जाते. याचा फायदा काही चाकरमानी घेताना दिसत आहे. चार पैसे जास्त मिळत असल्याच्या आमिषाने चालक व वाहक या लोकांना घेऊन येताना दिसत आहे. दस्तुरखुद्द उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे याबाबतच्या अनेक तक्रारी होत्या. म्हणून त्यांनी थेट पोलिस तपासणी नाक्यावरच उभा राहून काही आंबा-मासळी वाहुन नेणार्‍या ट्रकची चौकशी केली. त्यामधय काही चाकरमानी आणले जात असल्याचे उघड झाले. त्यांनी पोलिसांसमोरच त्यांना चांगलाच दम भरला.