लॉकडाउनमुळे रखडलेली विकासकामे पूर्ण करणे अशक्य
रत्नागिरी:- अर्थिक वर्ष जून महिन्यापर्यंत मुदतवाढ मिळाल्यामुळे जिल्हा परिषदेकडील निधी खर्च करण्यासाठी मूदत मिळाली आहे. त्याचा फायदा काही ठेकेदारांना झाला असून कागदोपत्री विकासकामे पूर्ण करण्यासाठी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे अखर्चिक निधीची रक्कम कमी होणार आहे; मात्र लॉकडाऊनमध्ये जी कामे रखडली आहेत, ती पूर्ण करणे अशक्य असल्यामुळे यंदा जिल्हा परिषदेचा अखर्चिक निधी वाढण्याची शक्यता वर्तविली होत आहे.
यंदा कोरोनाचा फटका काही कामांना बसण्याची शक्यता आहे. 24 मार्चपासून लॉकडाऊन झाल्यानंतर सर्वच कामे ठप्प झाली होती. अनेक ठेकेदारांना कामे पूर्ण झाल्यानंतर बिले सादर करता आलेली नव्हती. त्यामुळे 31 मार्चला ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर निधी अखर्चिक राहण्याची टांगती तलवार जिल्हा परिषद प्रशासनावर होती. लॉकडाऊनच्या कालावधीनंतर काही कामांना शिथिलता देण्यात आली असून मार्च अखेरही अजून क्लोज करण्यात आलेला नाही. त्यामुळे बिले खर्ची टाकणे शक्य झाले आहे. त्याचा फायदा रत्नागिरी जिल्हा परिषदेला होणार आहे. जी कामे अखेरच्या टप्प्यात आहेत, ज्या कामांची कागदोपत्री पूर्तता करणे बाकी आहे त्यांच्यासाठी ‘क्लोजिंग’ पुढे जाणे पथ्थ्यावर पडले आहे. काही लाखांचा निधी खर्ची पडणार आहे. जी कामे अर्धवट स्थितीत किंवा सुरुच झालेली नाहीत त्यांना याचा फायदा होणार नाही. तो निधी अखर्चितच ठेवावा लागणार आहे. कोरोनामुळे अखर्चित निधीत वाढ होईल अशी चिंता जिल्हा परिषद प्रशासनासह पदाधिकार्यांना लागलेली आहे.