महामार्गावरील रखडलेल्या पुलांच्या कामांसाठी नव्या ठेकेदाराची नियुक्ती

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील पुलांची कामे रखडली असून त्यांना चालना देण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. शास्त्री पुलासह कोळंबे, अंजणारी, सप्तगिरी या चार पुलांच्या कामांसाठी नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातील शास्त्री पुलाचे काम पावसाळ्यापुर्वी पूर्ण करा अशा सुचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पूलांची कामे चौपदरीकरणापूर्वी सुरु करण्यात आली होती. पन्नास टक्के कामे झाल्यानंतर मुख्य आणि पोट ठेकेदारांमधील वादात अडकली. दीड वर्षांहून अधिक काळी पूलांची कामे रखडली होती. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार ही कामे सुरु करण्यात आली आहेत. त्यामध्ये राजापूरला पुलासह शास्त्री, कोळंबे, अंजणारी, सप्तगिरी या पुलांच्या कामासाठी नवीन कंत्राटदार नेमण्यात आला आहे. त्यातील वाशिष्ठी पूलाचे काम पावसाळ्यापुर्वी पूर्ण करा अशा सुचना काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी ठेकेदाराला दिल्या आहेत. या चारही पुलांसाठी वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यातील राजापूर पुलाचे काम केसीसी कंपनीकडे सूपूर्द करण्यात आले आहे. ही कामे लवकरात लवकर सुरु झाली तर त्याचा फायदा निश्‍चितच वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी होणार आहे. चौपदरीकराणा व्यतिरिक्त गुहागर तालुक्यातील मोडआगार या पुलाचे कामही सुरु करण्यात आले असून ते पावसाळ्यापुर्वी पूर्ण करा अशा सुचना दिल्या आहेत.