रत्नागिरी :- आंबा वाहतूकीसाठी परवानगी असतानाही तालुक्यांतर्गत फिरणार्या काही बागायतदारांची अडवणूक होत असल्याचे प्रकार घडत आहेत. तपासणीच्या ठिकाणी असलेले पोलिस अधिकारी, कर्मचारी सोडत नसल्यामुळे बागायतदारांना अखेर त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधत रहावे लागत आहे. याबाबत आपले अनुभव बागयतदारांकडून सांगितले जात आहेत.
कोरोनाच्या पार्श्वुभुमीवर लॉकाडाऊन करण्यात आले आहे. त्यामधून शेतमाल वाहतूकीला काही दिवसांपुर्वी परवानगीही दिली गेली आहे. त्यामध्ये आंबा बागायतदारांचा समावेश आहे. बागेमध्ये आंबा काढायला जाण्यासाठी चार कामगार आणि एक चालक अशांना परवानगी दिली आहे; मात्र यामधून खासगी वाहनांना परवानगी दिलेली नाही. त्यासाठी पासेस अत्यावश्यक केले आहेत. शासनाची परवानगी असतानाही वाहतूकीच्या गाड्यांना अडवून ठेवले जात आहे. दोन दिवसांपुर्वी विमानतळ येथे बागायतदारांना असाच अनुभव आला. तेथे तपासणीसाठी असलेल्या अधिकार्यांनी चार कामगार आणि गाडीत एक चालक असतानाही गाडी अडवून ठेवली. वारंवार विनवणी करुनही त्यांना तेथून सोडण्यात आले नाही. बराच कालावधी गेल्यानंतर संबंधित बागायतदाराने वरीष्ठ पोलिस अधिकार्यांशी दुरध्वनीवरुन संपर्क साधला. त्यात दोन तास वाया गेले. शासनाकडून झालेले निर्णयांची तळातील अधिकारी, कर्मचार्यांकडून व्यवस्थित होत नसल्याचा अनुभव आल्यामुळे बागायतदार त्रस्त झाले आहेत. ज्या-ज्या ठिकाणी तपासणी नाके तयार केले आहेत, तेथील कर्मचार्यांना याबाबतच्या सुचना दिल्या जाव्यात अशी मागणी आंबा बागायतदार राजेंद्र कदम यांनी केली आहे. आंबा हंगाम एक महिन्यात संपूष्टात येणार आहे. या कालावधीत अडवणूक होऊ नये अशी सुचनाही त्यांनी केली आहे.