जिल्ह्यात 1,443 कामगार रस्त्यांवर कार्यरत

चौपदरीकरणासह पावसाळी कामे; निवासासह सोशल डिस्टन्सिंगची अट

रत्नागिरी :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील 266 किलोमीटरच्या चौपदरीकरणाचे काम लॉकडाऊनमध्ये अडकून पडले होते. केंद्र शासनाकडून रस्ते कामांना शिथिलता मिळाल्यानंतर निकषांचे पालन करत महामार्गावरील सहापैकी चार टप्प्यातील 178 किलोमीटरच्या कामाना सुरवात झाली आहे. सुमारे 1443 कामगार कार्यरत झाले असून त्यांची निवास व्यवस्था कामाच्या ठिकाणी करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे 21 मार्चपासून चौपदरीकरणाचे काम बंद ठेवण्यात आले होते. या कामासाठी आलेले परराज्यातील कामगार साईटच्या जवळच राहत होते. तर काहींनी आधीच गावी जाणे पसंत केले होते. पावसाळ्यापुर्वी चौपदरीकरणाची कामे सुरु करण्याचे आदेश केंद्र शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर पुन्हा मुंबई-गोवा महामार्गावर जेसीबी, पोकलेन सारख्या यंत्रांची घरघर सुरु झाली. रस्त्यांची जास्तीतजास्त काम पाऊस सुरु होण्यापुर्वी करा अशा सुचना ठेकेदारांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हे काम रात्रंदिवस सुरु राहील असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
रत्नागिरी-सिंधुुदुर्गमधील खेडपासून कुडाळपर्यंत सहा टप्प्यात कामे सुरु केली होती. लॉकडाऊनपुर्वी चार टप्प्यातील 50 टक्के काम पूर्णही झाले. त्यामध्ये कशेडी ते परशुराम घाट 44 किलोमीटरचे काम कल्याण टोलवेज इन्फास्ट्रक्चर कंपनीकडे आहे. तेथील 25 किमीचे पूर्ण झाले होते. शिथिलतेनंतर उर्वरीत कामाला सुरवात झाली आहे. चिपळूण तालुक्यात परशुराम ते खेरशेत हे काम चेतक कंपनीकडे असून सध्या तिथे पाचशे कामगार काम करत आहेत. संगमेश्‍वर, रत्नागिरी, लांजा तालुक्यातून आरवली ते कांटे एवढा रस्ता चौपदरीकरणात येतो. त्याचे काम अद्यापही सुरु झालेले नाही. एमईपी कंपनीकडे हा टप्पा होता. तांत्रिक अडचणीमुळे हॅन कंपनीकडे काम सूपुर्द करण्याच्या हालचाली सुरु आहेत. हा भाग पावसाळ्यानंतरच सुरु होईल असा अंदाज आहे. कांटे ते वाकेड या भागात काम करण्यासाठी 37 कामगारांची नोंद आहे. वाटूळ ते तळगाव या भागात 707 कामगार काम करत आहेत. हे काम केसीसी बिल्डकॉन कंपनीकडे आहे. मुंबई-गोवा महामार्गासह गुहागर ते चिपळूण रस्त्यावर पावसापुर्वी कामे आणि महामार्ग कामासाठी 76 कामगार कार्यरत आहेत. मिर्‍या रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील मिर्‍या ते शिरगाव, नाणिज ते करंजारी आणि साखरपा हायस्कूल ते मुर्शी येथील कामासाठी संंबंधित कंत्राटदारांनी 80 कामगारांची नियुक्ती केली आहे.

ठेकेदारांपुढे या अटी

रस्त्यांची कामे सुरु करण्यापुर्वी त्यांना आवश्यक नियमावलींची माहिती प्रशासनाकडून ठेकेदारांना देण्यात आली होती. त्यामध्ये कामगारांची निवास व्यवस्था कामांच्या ठिकाणी केली असून काम करताना सोशल डिस्टस्निंग ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक कामगाराने मास्क बांधणे बंधनकारक असून वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. त्या कामागारांची आरोग्य तपासणी करण्याची जबाबदारी ठेकेदारावर सोपवण्यात आली आहे.