राजापूर:- तालुक्यातील बारसू गावात एका 45 वर्षीय इसमाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून शरीरसंबंध ठेवत तरूणीवर मातृत्व लादल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गर्भधारणेच्या आठव्या महिन्यातच पिडीतेची प्रसूती होऊन जन्मलेल्या मृत अर्भकाची विल्हेवाटही लावण्यात आली. त्यामुळे राजापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत पिडीत मुलीने राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी जगन्नाथ सदाशिव बगाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जगन्नाथ बगाडे (45, बारसू, वरचीवाडी) यांचे पिडीत मुलीच्या घरी नेहमीच येणे-जाणे होते. सुमारे आठ महिन्यापूर्वी पिडीत मुलीच्या घरी कोणी नसताना बगाडे यांनी पिडीत मुलीवर जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर लग्नाचे अमिष दाखवून बगाडे यांनी पुन्हा शरीर संबध ठेवल्याचे पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. अशातच पिडीत मुलगी गर्भवती राहीली व दि.15 एपिल 2020 रोजी आठ महिन्यांची गरोदर असताना राहत्या घरात पिडीत मुलीची प्रसूती झाली.
त्यामुळे घरच्यांनाही धक्का बसला. जन्माला आलेल्या अर्भकाची कोणतीही हालचाल नसल्याने पिडीत मुलीच्या वडीलांनी अर्भक प्लास्टीक पिशवीत भरून बाहेर नेऊन टाकल्याचे पिडीतेने या तक्रारीत नमूद केले आहे. जगन्नाथ बगाडे यांनी दोन वेळा शरीर संबंध ठेऊन मातृत्व लादल्याचे पिडीतेने नमूद केले आहे.
या घटनेने राजापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी बगाडे यांच्या विरोधात भा.दं.वि. कलम 376, बालकांचे लैगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम यानूसार गुन्हा दाखल केला आहे.