रत्नागिरी :- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील ठरलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासन आणि नागरिकांनी शिस्तीने काम करुन कोरोना मुक्ती मिळवली आहे. येणाऱ्या काळात ही टिकवू या, अशा शब्दात राज्याचे परिवहन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी सर्वांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहेत.
कोरोना मुक्तीच्या या लढयाला सर्व सहभागी यंत्रणा, प्रशासन, पोलीस दल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी , ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांचे अधिकारी व सर्व पदाधिकारी यांनी कोरोना मुक्तीसाठी परिश्रम घेतले. या कारोना योध्दांचे काम मोलाचे आहेत असे श्री परब यांनी आपल्या व्हीडीओ संदेशात म्हटले आहे.
मंत्रीमंडळातील सहकारी मंत्री उदय सामंत यांच्यासह जिल्हाधिकारी व त्यांच्या सर्व यंत्रणेने केलेली कामगिरी मोलाची आहे. या सर्व कालावधीत रत्नागिरी जिल्ह्याने जे करुन दाखवले तसेच शिस्तीचे दर्शन घडवून राज्यातील सर्व जिल्हे कोरोनामुक्त व्हावेत यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात प्रयत्न सुरु आहे. राज्य आणि देश लवकर कोरोनामुक्त व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत असे ते म्हणाले.
नागरिकांनी जे सहकार्य दिले त्याबद्दल आभार, पुढील काळातही नागरिकांनी घरात राहून जिल्हा कोरोनामुक्त राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन श्री. परब यांनी केले आहे.