हाॅटस्पाॅट,कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी परवानगी
दिल्ली :- देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. प्रत्येक राज्यानं आपल्या पातळीवर 20 एप्रिलनंतर काही नियम शिथिल केले होते. देशभरात लॉकडाऊनमुळे अनेक दुकानदाराचं आणि व्यवसायिकांचं मोठं नुकसानं झालं आहे. या दुकानदारांसाठी आणि व्यवसायिकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. 25 एप्रिलपासून देशभरातील दुकानं उघडण्यास सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार काही नियमावली घालून देण्यात आली आहे. या नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
20 एप्रिलपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील नियम शिथिल करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मागच्या काही दिवसांपासून लॉकडाऊनमुळे दुकानं बंद होती. दुकानं उघडण्यासाठी सरकारनं परवानगी दिल्यामुळे देशभरातील लाखो दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. गृहमंत्रालयानं काढलेल्या आदेशानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दुकानं ही आजपासून सुरू करण्यात येणार आहे. या दुकानांची सरकारकडे नोंदणी असणं आवश्यक आहे. हा नियम हॉटस्पॉट असणाऱ्या शहरांना आणि जिल्ह्यांना लागू होणार नाही. तिथे लॉकडाऊनचे नियम कठोरपणे पाळले जाणार आहे. तर मोठे शॉपिंग मॉल, कॉम्प्लेक्स उघडण्यावर स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. 3 मेपर्यंत नियमाचं पालन करून नागरिकांनी खरेदी करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.
केंद्र सरकारनं जारी केलेल्या आदेशानुसार काही अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींची पूर्तता न केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. दुकानांनमध्ये केवळ 50 टक्के कर्मचारीच काम करू शकतात. दुकानदारांनी मास्क आणि हॅण्डग्लोज वापरायला हवेत. यासोबत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आवश्यक आहे. केंद्र सरकारनं जारी केलेल्या आदेशामध्ये हॉटस्पॉमधील दुकानं, मॉल्ससाठी हा आदेश लागू होणार नाही असाही सांगण्यात आलं आहे.