रत्नागिरी :- कोरोनामुळे वाडीवस्तीवर काम करणारी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. त्यांना येणार्या अडचणींसह ग्रामकमिट्यांचे कामकाजाची माहिती डे टू डे घेण्याचे काम जिल्हा परिषद आरोग्य विभागात सुरू केलेल्या फिडबॅक कोरोना कक्षातून सुरू आहे. लॉकडाऊन केल्यानंतर काही दिवसात हा कक्ष सुरू झाला असून दिवसाला दोनशे लोकांशी संपर्क साधला जातो.
कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन केल्यानंतर काही दिवसातच जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या सुचनेनुसार जिल्हा परिषदेत फिडबॅक कक्ष स्थापन करण्यात आला. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी गावस्तरावर ग्रामकमिटी स्थापन केल्या आहेत. शासनाची यंत्रणाही त्यात सहभागी आहे. आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा, ग्रामसेवक, तलाठी, पोलिसपाटील यांची फौज वाडी-वाडीमध्ये जाऊन तेथील घटनांवर प्रत्यक्ष लक्ष ठेवत आहेत. त्यांचे कामकाज कसे सुरु आहे, ते नियमित भेटी देतात ना, त्यांना कोणत्या अडचणी येतात का किंवा गावामध्ये काही नवीन घटना घडली का याची माहिती घेणे आणि त्या कर्मचार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी फिडबॅक कक्षातून दररोज दोनशे जणांशी संवाद साधला जात आहे. या कक्षात जिल्हा परिषदेच्या सहा कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याची संपूर्ण जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मनीषा देसाई आणि डॉ. व्ही. डी. शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे.
नियमित संपर्क साधल्यामुळे गावामध्ये कोणी नवीन व्यक्ती आली आहे का, कोरोना संशयित विलगीकरणासाठी ठेवलेल्या लोकांच्या घरी कर्मचारी भेटी देत आहेत का याची माहिती मिळत आहे. फोनवरुन संवाद साधल्यामुळे कर्मचारीही गांभिर्याने काम करताना दिसत आहेत. या कक्षाचे काम दोन टप्प्यात म्हणजे सकाळी 8 ते 2 आणि दुपारी 2 ते 6 चालते.