खाडीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू

रत्नागिरी :- सांडेलावगण-कासारी ग्रुप ग्रामपंचायत विभागातील खाडीवर कालवे काढण्यासाठी गेलेल्या चाफेरी गावच्या दोन ग्रामस्थांचा पाण्याचा अंदाज न आल्याने खाडीमध्ये ओहोटीच्या प्रवाहात वाहत जाऊन बुडून मृत्यु झाला. त्यापैकी एका गृहस्थाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या मृतदेहाचा शोध सुरु आहे. आज सकाळी 6.30 वाजता ही घटना घडली.

सांडेलावगण गावचे ग्रामस्थ श्री. नरेश पाष्टे हे मासेमारी करत असताना त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी आरडाओरडा असलेल्या दिशेने होडी वळवली आणि काही अंतरावर एक मृतदेह सापडला. त्यांनी तो मृतदेह ओढून आपल्या होडीत घेतला व पोलीसांना फोन करून कळविले. मृत झालेल्या व्यक्तींची नावे श्री. संतोष पिंपळे व श्री. संजय गुरव अशी आहेत. दुसरा मृतदेह शोधण्यासाठी सांडेलावगण-कासारी गावचे ग्रामस्थ, पोलीस यंत्रणेची शोधमोहीम सुरु आहे. चाफेरी गावावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. आजुबाजुच्या गावामध्ये झालेल्या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे .पुढील तपास जयगड पोलिस ठाणे व खंडाळा पोलिस करित आहेत