विशेष पार्सल ट्रेनने कोकणचा राजा अहमदाबादला रवाना

रत्नागिरी :- विशेष पार्सल ट्रेनने रत्नागिरीचा हापूस आंबा अहमदाबाद येथे पाठवण्यात आला आहे. गुरुवारी रात्री 10.30 च्या सुमारास ही विशेष ट्रेन रत्नागिरी स्थानकावर आली. या ट्रेनने जवळपास 40 पेटी आंबा अहमदाबादला पाठविण्यात आला आहे.

कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे या कठीण परिस्थितीत कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकणासह दक्षिणेकडील राज्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. याकरीता कोकण रेल्वेच्या मार्गावर रो रो व मालगाडीच्या बरोबरच स्पेशल पार्सल ट्रेन चालवल्या जात आहे. याच स्पेशल पार्सल ट्रेन मधून गुरुवारी रात्री केरळमधून बनाना चिप्स कोकणात दाखल झाल्या. केरळमधून आलेल्या या चिप्स कणकवली आणि रत्नागिरी स्थानकात उतरवल्या गेल्या. याच बरोबर उड्डपी येथून मडगाव येथे तीन टन माल उतरवला गेला. त्यानंतर या विशेष पार्सल ट्रेनमधून रत्नगिरीचा हापूस आंबा अहमदाबाद येथे पाठवण्यात आला. कोरोनामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प असल्याने आंबा व्यावसायिकांना आंबा राज्यात व राज्याबाहेर पाठविण्यात कोकण रेल्वे महत्वाची भूमिका बजावत आहे. रस्ते वाहतुकीपेक्षा निम्याहून कमी दरात आंब्याची वहातूक कोकण रेल्वेच्या माध्यमातून होत आहे. 27 एप्रिल पासून कोकण रेल्वेच्या मार्गावर दुसरी पार्सल ट्रेन धावणार आहे.