रत्नागिरी:- कार्यालयात यायला उशिर का झाला असे विचारल्याच्या कारणातून आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यास अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या दुय्यम निरीक्षकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवार १७ एप्रिल रोजी सकाळी १०. ४० वा. सुमारास राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयात घडली.
सुनिल एम. सावंत असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुय्यम निरीक्षकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात शरद अंबाजी जाधव ( ५२, रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, १७ एप्रिल रोजी शरद जाधव हे कार्यालयात हजर होते. सकाळी १०. ४० सुमारास त्याच्या कार्यालयातील दुय्यम निरीक्षक पदावर कार्यरत असलेले सुनिल सावंत हा उशिरा कार्यालयात आला. याबाबत शरद जाधव यांनी त्याला विचारणा केली. याचा राग आल्याने सावंत याने जाधव यांच्या केबीनजवळ उभे राहुन त्यांना अश्लिल व खालच्या दर्जाचे शब्द वापरुन शिवीगाळ केली होती. याबाबत शुक्रवार २४ एप्रिल रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.