जिल्हा कोरोनामुक्त होण्यात सर्वांचा समान वाटा-ना.सामंत

रत्नागिरी :- समस्त जिल्हावासीयांसाठी समाधानाची बाब आहे, की रत्नागिरी जिल्हा आता कोरोना मुक्त झाला आहे. जिल्ह्यात सहा कोरोना रुग्ण होते, त्याची संख्या आता शून्य  झाली आहे. यामध्ये जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस दल या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.येथील शासकीय विश्रामगृह मध्ये पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक चर्चेवेळी ते बोलत होते. 

श्री सामंत म्हणाले, कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आले आंबे. तसेच 20 एप्रिल पासून काही उद्योग, व्यवसायांना मुभा देण्यात आली. मात्र अटी शर्थीचे काटेकोर पालन करूनच हे व्यवसाय सुरू आहेत. सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे या बाबींना जास्त महत्त्व दिले जात आहे. मत्स्य व्यवसायाला देखील केंद्र शासनाने परवानगी दिल्यानंतर तो व्यवसायही अटी शर्ती पाळूनच केला जात आहे.मला जिल्हा वासियांचे कौतुक करावेसे वाटते की, या  लॉक डाऊनच्या काळात आपल्या जीवावर उदार होऊन सर्वांचं रक्षण करणाऱ्या आरोग्य विभाग, पोलिस विभाग, व त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व यंत्रणेला चांगले सहकार्य केले. त्याचाच हा परिपाक म्हणून जिल्हा आज कोरणा मुक्त झाला आहे. मात्र जिल्हावासीयांची जबाबदारी आता पुन्हा वाढली आहे. शासनाच्या आदेशानुसार आपण तीन मेपर्यंत संयम पाळून आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन ,पोलिस यंत्रणेला असेच सहकार्य करावे आणि जिल्ह्यामध्ये पुन्हा कोणाचा शिरकाव होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे आवाहन सामंत यांनी केले..