घरापासून दूर, लहानग्यांची आठवण… तरीही हे करताहेत कोरोनाशी दोन हात

रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्हा कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर आहे. यात प्रशासन, वैद्यकीय अधिकारी यांचे जेवढे योगदान आहे तितकेच योगदान जिल्हा रुग्णालयातील कोरोना वार्डात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आहे. महिन्यापेक्षा अधिक काळ कुटुंबापासून दूर… लहान मुलांना भेटण्याची ओढ…असे असताना देखील जिल्हा रुग्णालयातील 20 कर्मचारी कोरोनाशी दोन हात करतायत. आधी देशसेवा नंतर कुटुंब ही भावना मनात घेऊन या 20 कर्मचाऱ्यांनी जणू कोरोना संपवण्याचा विडाच उचलला आहे.

जिल्ह्यातून कोरोना हद्दपार करण्यात महत्वाची भूमिका आहे, ती आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची. जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय अधिकाऱ्यांसोबत परिचारिका, वॉर्डबॉय, शिपाई, वॉचमनआपले कर्तव्य बजावत आहेत. जिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधित वार्डात 11 तर संशयित वार्डात 9 परिचारिका कार्यरत आहेत. यापैकी अनेकांना लहान लहान मुले आहेत. 1 महिन्यापेक्षा अधिककाळ आपल्या मुलांपासून दूर राहूनही या सर्व कर्मचारी कोरोनाशी दोन दोन हात करीत आहेत.यापैकी एका कर्मचाऱ्याला 8 वर्षाची चिमुकली आहे. कोरोनामूळे दुरावल्याने हे दोघे सध्या मोबाईल वरूनच एकमेकांच्या संपर्कात आहेत. आई, वडील आणि चिमुकलीच्या नात्यात मोबाईलच दुवा ठरला आहे. दिवसभर ८ ते १२ तास ड्युटी. जीव धोक्यात घालून सेवा देताना उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाचे आशिर्वादच कोरोना विरोधात लढण्यासाठी बळ देतात असे येथे काम करणाऱ्या गायत्री गोराटे यांनी सांगितले.केवळ कोरोना रुग्णांना बरे करता यावे, म्हणून महिनाभराहून अधिक काळ येथील प्रत्येक कर्मचारी आपल्या लहान मुलांपासून दूर आहेत. साहजिकच मानसिक दडपण येणार मात्र कोरोनाला हरवण्यासाठी या दडपणावर मात करून प्रत्येक कर्मचारी कार्यरत असल्याचे गायत्री गोराटे यांनी सांगितले. स्वतः चा जीव धोक्यात घालून केवळ रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिकांकडून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरीकांनी खूप काही शिकण्यासारखे आहे.