रत्नागिरी – कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने राज्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी राज्यात पुन्हा लॉकडाऊन वाढविण्यात आले. या काळात गरीब आणि गरजूंना मोफत धान्यपुरवठा करण्यात आला. यानुसार एपीएल (केशरी) आणि दारिद्रयरेषेवरील शिधापत्रिकाधारकांना आजपासून धान्य देण्यास सुरुवात झाली. मे व जून महिन्यासाठी धान्य दिले जाणार आहे.
मात्र 70 टक्केच धान्यसाठा उपलब्ध असल्याने जिल्ह्यातील 1 लाख 6 हजार 769 शिधापत्रिका व त्यावरील 4 लाख 35 हजार 161 सदस्यांना त्याचे वाटप होणार आहे.लॉकडाऊन वाढल्याने सर्वच नागरिक यात भरडले गेले आहेत. त्यांना पुरेसा धान्य साठा मिळावा, यासाठी एपीएल ( केशरी ) शिधापत्रिका आणि त्यावरील कार्डधारकांनाही गहू व तांदूळ देण्याचा निर्णय झाला आहे. जिल्ह्यात एपीएल ( केशरी ) शिधापत्रिका व त्यावरील 73 हजार 597 शिधापत्रिका व त्यावरील 3 लाख 17 हजार 277 सदस्य आहेत. त्यांना 952 मे. टन गहू व 635 मे. टन तांदूळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु जिल्ह्यामध्ये एकूण 1 लाख 6 हजार 769 शिधापत्रिका व त्यावरील 4 लाख 35 हजार 161 सदस्य संख्या प्राप्त झाली आहे. अन्नधान्य हे जिल्ह्यातील मागणीच्या 70 टक्के उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लाभधारकांना 70 टक्केप्रमाणे धान्य वाटप करण्यात येणार आहे.