रत्नागिरी:- येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने राज्यावर कोरोनाचा प्रभाव असतानाही महसुलामध्ये मोठी मजल मारली आहे. मार्च 2020 पर्यंत विविध कर, परवाने, पासिंग, कारवाई आदीच्या माध्यमातून 62 कोटी 41 लाख महुसल वसुल केला आहे. तर वर्षभरात नव्याने या कार्यालयात 23 हजार 146 सर्व प्रकारच्या वाहनांची नोंदणी झाली आहे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी ही माहिती दिली.
कोरोनाचा सर्व क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे देश आर्थिक अडचणीत आला आहे. कोरोनाशी सामना करताना अनेक ठिकाणी सवलती दिल्या जात आहेत. तर काही ठिकाणी कटु आणि कठोर निर्णय घेऊन महसुल गोळा केला जात आहे. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला सुमारे 70 कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे त्यामध्ये 10 टक्के कपात केली आहे. प्रादेशिक कार्यालयाने एकुण महसुल 62 कोटी 41 लाख महसुल वसुल केला आहे. गतवर्षीही आरटीओ कार्यालयाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले होते. वसूल केलेल्या महसुलामध्ये वाहन शुल्क वसूल, वाहन कर, नवीन वाहने, मालवाहतूक वाहनांचा समवेश आहे. मार्च अखेर 70 कोटी 74 लाख चे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान आरटीओ कार्यालयासमोर आहे. कोरोनामुळे 10 टक्के उद्दिष्ट कमी केल्याने 62 कोटी 41 लाख वसुल केले आहेत. म्हणजे आरटीओ कार्यालयाने जवळजवळ उद्दिष्ट पुर्ण केले आहे.
जिल्ह्यातील वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बँकांकडून मिळणारे सुलभ कर्ज आणि दुचाकी वापरात महाविद्यालयीन तरुणांनी घेतलेली आघाडी या सर्वांचा परिणाम दुचाकी खरेदीवर झाल्याचे दिसून येत. मागील काही कालावधीपासुन दुचाकीसह चारचाकी खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. हौस आणि प्रतिष्ठेसाठी प्रत्येकजण स्टाईलीश दुचाकी खरेदी करत असल्याने मागील काही कालावधीत वाहन नोंदणी आणि खरेदीचा आलेख वाढत आहे. वर्षभरात नवीन वाहन नोंदणी 23 हजार 146 एवढी झाल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.