रत्नागिरी :- कोरोनामुळे शासनाने मार्च महिन्यातच शाळांना सुट्टी दिली. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या पोषण आहाराचे धान्य विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार 2,688 शाळांना एकूण 4,073,844 किलो तांदूळ व 100839 किलो कडधान्य वाटप केले आहे. या शाळांतील 87 हजार 247 विद्यार्थ्याना याचा लाभ झाला आहे.
कोरोनाचा प्रार्दुभाव वाढल्यानंतर केंद्र शासनाने देशात लाॅकडाऊन जाहीर केले. त्यानंतर राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली. तसेच राज्य शासनाने सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. आठवी इयत्तेपर्यंतच्या सर्व परिक्षा रद्द करती सर्वांना पुढच्या वर्गात प्रवेश दिला. मात्र आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरविला जातो. त्यामुळे त्यांच्या पोषण आहाराचे धान्य शिल्लक राहिले होते. हे धान्य वितरीत करण्याची मागणी झाली. परिणामी राज्याच्या शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना एप्रिल महिन्यापर्यंतचा शिल्लक राहिलेला धान्यसाठा विद्यार्थ्यांना वितरीत करण्याचे आदेश दिले होते.
शिक्षण विभागाने 24 एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील 2,963 शाळांपैकी 2,688 शाळांमध्ये तांदूळ व डाळ तसेच अन्य कडधान्य वाटप करण्यात आल्याची माहिती येथील सूत्रांकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 1 लाख 31 हजार 647 विद्यार्थी पोषण आहाराचे लाभार्थी आहेत. यातील यातील 87 हजार 247 विद्यार्थ्यांना धान्य वाटप करण्यात आले आहे. मंडणगड 38, दापोली 21, खेड 9, चिपळूण 62, गुहागर 15, संगमेश्वर 14, रत्नागिरी 85, लांजा 18 आणि राजापूर 13 शाळेतील विद्यार्थ्याना पोषण आहार वाटप करणे बाकी आहे.