लॉकडाऊन काळात 16 हजार वाहनचालकांवर कारवाई

रत्नागिरी:-  जिल्ह्यात लॉकडाऊन असताना देखील अनावश्यक फिरणे व वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या सुमारे 16 हजार वाहनधारकांवर तब्बल 55 लाख रूपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. तर 22 एप्रिल या एकाच दिवशी सुमारे 671 जणांविरूद्ध 2 लाख 50 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा वाहतूक पोलीस निरिक्षक अनिल विभूते यांनी दिल़ी.

जिल्हा वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाईचे पाऊल उचलण्यात आल़े  22 मार्च ते 22 एप्रिल या मुदतीत या मोहिमेत अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई मोहिमेत विनाहॅल्मेट प्रवास करणार्‍या 7 हजार 147 जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर 35 लाख 73 हजार 500 रूपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. सीट बेल्ट न वापरणार्‍या 634 कारचालकांकडून 1 लाख 26 हजार 800 रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच अनावश्यक फिरणार्‍या 3 हजार 174 जणांविरूद्ध करण्यात आलेल्या कारवाईत 6 लाख 34 हजार रूपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. 

लॉकडाऊनच्या काळात विनापरवाना वाहने चालविण्याचे प्रमाण देखील वाढल्याचे दिसून येत आहे. विनापरवाना फिरणार्‍या 261 वाहनधारकांकडून 1 लाख 30 हजार 500 रूपयांचा दंड लावण्यात आला आहे. अजूनही संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरची वर्दळ कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे.  या कारवाई विना हॅल्मेट असलेल्या 7147 जणांना  35,73,500  विना सिट बेल्ट 634 जणांना 1,26,800  दंड, विना परवाना 261 जणांना 1,30,500 रु. दंड, फॅन्सी नंबर असलेल्या 379 जणांना 81,400 रु. दंड, विनाकारण फिरणार्‍या 3174 जणांना 6,34,800 दंड,  ट्रिपल सिट 94 जणांना 18,800 दंड ठोठावण्यात आला आहे.