जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट कंपनीमुळे वाटद- खंडाळा बाजारपेठेतील मच्छीमार्केटचा प्रश्न मार्गी

प्रतिनिधी:- वाटद- खंडाळा बाजारपेठेत मच्छी विक्री करण्यासाठी स्वतंत्र जागा नव्हती. परिणामी मच्छी विक्रेते रस्त्यावर बसून मच्छी विक्री करत होते. जागा व निधी या दुहेरी अडचणींमुळे मच्छीमार्केट उभारणी शक्य नव्हते. या पार्श्वभूमीवर वाटद- खंडाळा ग्रामस्थांनी जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट कंपनीकडे मच्छीमार्केटसाठी केलेली निधीची मागणी मंजूर करत सुसज्ज मार्केटची उभारणी केली. सोशल डिस्टंसिगचे पालन करुन शनिवारी मार्केट सुरु करण्यात आले.    

वाटद खंडाळा बाजारपेठेतील अनेक वर्ष रखडलेला मच्छी मार्केटचा प्रश्न अखेर जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट कंपनीच्या सहाय्याने वाटद- खंडाळा ग्रामपंचायतीने सोडवला. वाटद- खंडाळा बाजारपेठेत मच्छी विक्री करण्यासाठी स्वतंत्र अशी जागा नव्हती. परिणामी मच्छी विक्रेते रस्त्यावर बसुन मच्छी विक्री करत होते. गावचे सरपंच श्री बापु घोसाळे व ग्रा. पं. ची पुर्ण टिमनेे जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट कंपनीकडे मच्छी मार्केटसाठी निधीची मागणी केली व ती मागणी कंपनीने तात्काळ मंजूर केली. व खंडाळा येथील आठवडा बाजारालगत, खुले क्षेत्र असलेल्या जागेत सुसज्ज असे मच्छी मार्केट बांधण्यात आले. परंतु कोरोनामुळे लाॅॅकडाऊन घोषित केल्याने उद्घाटन रखडले होते. अखेर सोशल डिस्टंसिगचे पालन करत शनिवारी ग्राहकांसाठी मार्केट सुरु केले. आता मच्छी विक्रेत्यांना सावली मिळाली असून वाहतूक व्यवस्थाही सुरळीत चालू राहील.