कोकण रेल्वेच्या पार्सल गाडीला प्रतिसाद; 27 एप्रिलला दुसरी फेरी

रत्नागिरी :- कोकण रेल्वे मार्गावर सुरु करण्यात आलेल्या ओखा-तिरुवअनंतपुरम या पार्सल गाडीला पहिल्याच फेरीला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे 27 एप्रिलला दुसरी फेरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीत जीवनावश्यक वस्तूंची वाहतुक करण्यासाठी रेल्वे प्रशासन पुढे सरसावले होते. गुजरातहून विविध प्रकारचे साहित्य कोकणासह दक्षिणेकडील भागात पोचवणे शक्य आहे. त्यात सर्वाधिक औषध कंपन्यांचा समावेश आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन रेल्वे प्रशासनाने ओखा एक्स्प्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. त्या गाडीतून औषधे आणि मच्छीची वाहतुक झाली. रत्नागिरी, कणकवलीतही औषधांचा पुरवठा झाला. या पार्सल गाडीचा सर्वाधिक फायदा केरळमधील व्यावसायिकांनी घेतल्याची माहिती पुढे आली आहे. औषधांबरोबरच मासळीचीही वाहतूक केली गेली. पहिल्या फेरीच्या परतीचा प्रवास 23 ला सुरु होणार असून त्यातून कोकणातील हापूस अहमदाबाद मार्केटला पाठविणे शक्य आहे. काही बागायतदारांनी दुरध्वनीवरुन कोकण रेल्वे प्रशासनाकडे चौकशीही केली आहे. त्याला प्रतिसाद मिळेल अशी शक्यता आहे. पहिल्या फेरीला मिळालेला प्रतिसाद पाहून रेल्वे प्रशासनाने ओखा-तिरुवअनंतपुरम पार्सल गाडीची दुसरी फेरी 27 ला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ती 29 ला तिरुवअनंतपुरमला पोचेल. ती गाडी 28 ला सकाळी 11.30 ला रत्नागिरीत पोचेल. तीचा परतीचा प्रवास 29 ला सुरु होणार असून 30 ला ती रात्री 23.10 वाजता रत्नागिरी स्थानकात येईल असे रेल्वे प्रशासनाकडून एका पत्रकाद्वारे सांगण्यात आले.