कोकणच्या राजासाठी उघडले बाजार समितीचे दार

रत्नागिरी :- कोरोनामध्ये रत्नागिरीतील आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक यांच्या प्रयत्नामुळे बाजार समितीच्या लिलाव केंद्रात आंबा खरेदी-विक्रीला आरंभ झाला आहे. तीन बागायतदारांनी आपले आंबे विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले होते, तर पाच खरेदीदारांनी येथे हजेरी लावली. भविष्यात यामध्ये भरघोस वाढ होईल अशी आशा जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक गार्डी यांनी व्यक्त केली.
कोरोनामुळे स्थानिकस्तरावर आंबा खरेदी-विक्री केली जावी यासाठी उपनिबंधक कार्यालयाने उपक्रम हाती घेतला होता. रत्नागिरीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलाव केंद्रात आतापर्यंत प्रक्रियाच झाली नव्हती. सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक खर्च करुन दोन वर्षांपुर्वी ही इमारत बांधण्यात आली होती. ती जागा भाजीपाला लिलावासाठी वापरण्यास सुरवात झाली. गतवर्षी बाजार समितीने प्रयत्न केला, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. कोकणातील बागायतदार वाशीतील दलालांशी बांधलेला असल्यामुळे स्थानिकस्तरावर लिलावाला प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण पुढे आले होते. कोरोनामुळे वाहतुकीत येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन यंदा आंबा खरेदी-विक्री प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय घेतला. दुपारी 3 वाजता ही प्रक्रिया झाली. अनेक बागायतदारांना याची माहिती नसल्यामुळे त्यांनी आंबा आणण्याऐवजी हजेरी लावले पसंत केले. तर प्रचार, प्रसार केल्यामुळे काही बागायतदारांनी दुरध्वनीवरुन विचारणा केली. तिन बागायतदारांनी आंबा विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला होता. त्याठिकाणी बागायतदार आणि खरेदीदार यांच्यात दर निश्‍चित करुन खरेदी प्रक्रिया पार पडली. यावेळी पाच खरेदीदार उपस्थित होते. पाच आंबा पेटी, पाच क्रेट लुझ माल तर पिकलेल्या आंब्याचे बॉक्स ठेवण्यात आले होते. पाच डझनची पेटी सरासरी 1700 रुपयांनी विक्रीला काढली गेली, तर सात क्रेटचे सात हजार रुपये आले. त्या एका तासामध्ये सुमारे पंधरा हजार रुपयांची खरेदी-विक्री झाली.
या प्रक्रियेवेळी डॉ. गार्डी यांच्यासह पणनचे अधिकारी मिलिंद जोशी, बाजार समिती सचिव किरण महाजन, उपसभापती अनिल जोशी, माजी सभापती दत्तात्रय ढवळे, आंबा बागायतदार राजू पेडणेकर, प्रसन्न पेठे यांच्यासह अन्य लोकांची उपस्थिती होती.