एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या ट्रॉलरवर कारवाई

रत्नागिरी:- मासेमारी ट्रॉलरवर एलईडी लाईट बसवून मासेमारी करणाऱ्या ट्रॉलरवर मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. भगवती बंदर पासून साडेअकरा नॉटिकल अंतरावर ही कारवाई करण्यात आली.मिरकरवाडा येथील अन्वर पांजरी या स्थानिक मच्छीमाराची ही नौका असून या नौकेतून म्हाकूळ गरवले जात होते. 

लॉकडाऊननंतर मासेमारी व्यवसायाला केंद्र शासनाने शिथिलता दिली आहे. मागील दोन दिवसांपासून मासेमारी व्यवसायाला सुरुवात झाली. नियम आणि अटींच्या अधीन राहून मासेमारी व्यवयासाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र नियम व अटी पायदळी तुडवणाऱ्या नौकांवर कारवाईसाठी यंत्रणा ही सज्ज ठेवण्यात आली आहे. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त भादुले व परवाना अधिकारी सावंत यांच्या उपस्थितीत सागरी गस्त सुरू असताना भगवती बंदर पासून काही अंतरावर एलईडी ट्रॉलर च्या माध्यमातून मासेमारी सुरू असल्याचे निदर्शनास आले. या ट्रॉलरला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. मिरकरवाडा खडप मोहल्ला येथे राहणाऱ्या अन्वर पांजरी यांची ही नौका असून या नौकेवर 20 किलो म्हाकुल मिळाले आहेत. नौकेवरील 1 तांडेल 3 खलाशी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.